जळगाव : महाराष्ट्र राज्य बुध्दिबळ संघटनेतर्फे आयोजित केलेल्या ऑनलाइन बुध्दीबळ निवड चाचणीत स्पर्धेत १० वर्षाखालील वयोगटात जळगावच्या तसीन रफिक तडवी याने ९ पैकी ८.५ मिळवित स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. गुरुवारी हा निकाल जाहीर करण्यात आला. तसीनची निवड आता राष्ट्रीय स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. या स्पर्धेत तसीन याने ८ सामन्यात विजय तर एका सामन्यात बरोबरी केली.
राष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धा २८ ते ३० जून दरम्यान ऑनलाइन होणार आहे . त्यातून भारतीय संघाची निवड केली जाणार आहे. या स्पर्धेत ६१८ खेळाडू सहभागी झाले होते. तसीनला प्रशांत कासार यांचे मार्गदर्शन मिळाले. त्याच्या यशाबद्दल जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन,सचिव नंदलाल गादिया यांनी त्याचे कौतुक केले आहे.