स्थायी समिती सदस्यांची मागणी : सभा नियमित होत नसल्याने नगरसेवक आक्रमक
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एकीकडे महापालिकेला शासनाकडून निधी प्राप्त होत नाही, तर दुसरीकडे शहर व प्रभागाचा विकास करण्यासाठी नगरसेवक आपापल्यापरीने निधी आणतात. मात्र, मनपातील अधिकाऱ्यांचा निष्क्रियपणामुळे निधी खर्च न होता तो व्यपगत होण्याची शक्यता निर्माण होत आहे. त्यामुळे निधी खर्चामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत नगरसेवकांनी केली आहे.
मनपाची स्थायी समितीची सभा बुधवारी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. या बैठकीत स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, अतिरिक्त आयुक्त विद्या गायकवाड, नगरचिव सुनील गोराणे आदींची उपस्थिती होती. सभेपुढे मंजुरीसाठी एकूण ११ विषय ठेवण्यात आले होते. यापैकी चार विषय सभेत तहकूब ठेवण्यात आले होते. सभेच्या सुरुवातीलाच सर्व सदस्यांनी मनपाचा निधी खर्च होत नसल्याचा मुद्द्यावरून प्रशासनाला धारेवर धरले. नितीन लढ्ढा यांनी मनपा अधिकाऱ्यांच्या उदासीन कारभारावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
दैनंदिन शुल्क आकारणीच्या विषयासह
चार विषय तहकूब
दैनंदिन बाजार शुल्कवसुलीबाबतचा प्रशासनाकडून आलेल्या अहवालाच्या प्रस्तावाला सभेने तहकूब ठेवले, तर अतिक्रमण विभागासाठी १०, तर कोविड सेंटरमधील साफसफाईसाठी मक्तेदाराला मुदतवाढीच्या विषयावरून सभेत चर्चा झाली. यात मुदतवाढ देण्याऐवजी नवीन निविदा प्रसिद्ध करावी, अशी भूमिका सभापतींनी घेतली. मात्र, मुदतवाढ दिल्यास कामात व्यत्यय येणार नाही, अशी भूमिका प्रशासनातर्फे मांडण्यात आली. बराच वेळ चर्चेनंतर हा विषयदेखील तहकूब करण्याचा निर्णय झाला.
सभा नियमित होत नसल्याने सदस्य आक्रमक
स्थायी समितीची सभा नियमित होत नसल्याने शहर विकासाचे अनेक विषय अनेक दिवस प्रलंबित राहत असल्याने नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांना धारेवर धरले, तसेच उपमहापौर कुलभूषण पाटील यांनीदेखील याबाबत नाराजी व्यक्त करत, प्रत्येक आठवड्यात सभा घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यावर सभापती घुगे-पाटील यांनी उत्तर देत, कोरोनाकाळात कोरोनावरील उपाययोजनांच्या विषयांव्यतिरिक्त इतर विषयांसाठी सभा घेण्यात येईल, असे सांगितले. मात्र, त्यावरदेखील नगरसेवकांचे समाधान न झाल्याने, पुढील आठवड्यापासून नियमित सभा घेण्यात येईल, असे आश्वासन सभापतींनी दिले.