लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शिरसोली येथील एका विवाह सोहळ्यात पहिली मानाची पंगत ही सामाजिक समरसतेची बसली होती. अमर काटोले आणि सीमा फुसे यांच्या विवाह सोहळ्यात सर्व समाजातील २८ नवदांपत्याना भोजनास बसवण्यात आले. यावेळी परिसरातील मान्यवर उपस्थित होते.
हा विवाह सोहळा वेळेत पार पडला. त्यानंतर ही नवदांपत्याची सामाजिक सलोखा निर्माण करणारी समरसता पंगत भोजनासाठी बसवण्यात आली. त्यावेळी त्यांचा भेटवस्तू देऊन योग्य तो सत्कार केला गेला. स्वतः अमर काटोले आपल्या नववधूसोबत अन्य प्रथा-परंपरा, मानापमान बाजूला सारीत प्रत्यक्ष या पंक्तीत येऊन भोजनासाठी बसले.
यातून सर्व समाजातील नागरिकांसाठी एक आदर्श निर्माण झाल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. या सोहळ्यात सर्व समाजातील दांपत्यांना एकत्र बसवून वधू व वर पित्यांनी समरसतेचा गोडवा वाढवला.