लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : काही दिवसांपूर्वी स्थिर असलेले साखरेचे भाव सणासुदीच्या काळात वाढले असल्याचे चित्र आहे. नागपंचमीपासून सुरू होणाऱ्या सणसमारंभात गोडधोड पदार्थ बनविण्यासाठी आणि इतरही कारणांसाठी साखरेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. असे असतानाच आता व्यापाऱ्यांनी खाद्य तेलापाठोपाठ साखरेचे भाव वाढवून सर्वसामान्यांचे बजेट कोलमडून टाकले आहे.
२०२१ या वर्षात वाहनांतील इंधनाचे आणि खाद्यतेलाचे दर चांगलेच कडाडले आहेत.
का वाढले भाव?
उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यात चहा पिण्याचे प्रमाण अधिक वाढते. परिणामी साखर अधिक खरेदी केली जाते. पावसाळ्याच्या दिवसांत गाळप कमी होत असल्याने आहे त्या साठ्यातील साखर बाजारात आणली जाते. याच दिवसांत सणसमारंभ अधिक असल्याने प्रत्येक सणाला काहींना काही गोडधोड करावेच लागते.
यासोबतच आंतरराष्ट्रीय आयात-निर्यातीचाही परिणाम सध्या मोठ्या प्रमाणात होत असल्याने साखरेचे भाव वाढले असल्याची माहिती समोर येत आहे.
साखरेचे दर प्रति क्विंटल
जानेवारी ३२२०
फेब्रुवारी ३३००
मार्च ३३३०
एप्रिल ३३४०
मे ३३७०
जून ३३५०
जुलै ३४००
ऑगस्ट ३५००
महिन्याचे बजेट वाढले!
आधीच खाद्यतेल आणि इतर वस्तूंचे दर वाढलेले असताना आता यात भरीस भर साखरेचेही दर वाढल्याने महिन्याचे आर्थिक गणित विस्कटले आहे. आता आणखी पुढील किती दिवस पुन्हा हे दर वाढलेले राहतील हे सांगता येत नसल्याने किराणा भरताना काटकसर करावी लागणार आहे.
- रोहिणी जोशी, गृहिणी
साखर कितीही महागली तरी घरातील वयोवृद्धांना चहा तर लागतोच. आता पुढील काही दिवसांत येणाऱ्या सणसमारंभांमध्ये गोडधोड पदार्थ तर करावेच लागणार आहेत. साखरेचे दर वाढले तर ते एवढे नसून, इतर वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ते आधी कमी होणे गरजेचे आहे.
- राज मेश्राम, भुसावळ