लम्पी स्कीन डिसिज या विषाणूजन्य रोगाचा प्रसार व रोगावरील महागडा उपचार पशुपालकांना परवडणारा नसल्याने लस उपलब्ध झाल्याने त्यांनी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले आहेत.
दरम्यान, पिंप्रीहाट येथील एका संकरित गायीपाठोपाठ खेडगाव येथील नाना मुरलीधर हिरे यांच्या एका बैलाचादेखील या विषाणूने मागील आठवड्यात बळी घेतला आहे.
दुसऱ्या बैलात विषाणूची लक्षणे दिसत आहे. आजच शेतकरी ऐन कामाच्या दिवसात बैलजोडीविना झाला आहे. जवळ जवळ लाख किमतीची ही बैलजोडी होती. तालुक्यात एकूणच गिरणा परिसरात लम्पी स्कीन डिसिजचा शिरकाव झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा पशुसंवर्धन विभागाने तत्काळ लम्पी विषाणूजन्य रोगाचे लक्षणे असलेल्या जनावरांचे रक्त, लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. हे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्हाभरात लम्पी स्कीन डिसिजचे लसीकरण हाती घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
कोळगाव पशुवैद्यक दवाखाना (श्रेणी-२) अंतर्गत पाच किमी परिसरातील गावांतील जनावरांना हे लसीकरण सुरू झाले आहे. पिंप्रीहाट, खेडगाव, बात्सर, पिचर्डे, शिवणी आदी गावांना लसीकरण सुरू झाल्याची माहिती पशुधन पर्यवेक्षक रवींद्र साळुंखे यांनी दिली. टप्प्याटप्प्याने लसींच्या पुरवठ्यानुसार हे लसीकरण होणार आहे.