अमळनेर : शहरातील विद्युतप्रभा कॉलनीतील रहिवासी पूजा राजेंद्र पाटील (२७) हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.
पूजा ही रविवारी रात्री ९ वाजता तिचे आई, वडील व भाऊ यांच्यासोबत गप्पा मारल्यानंतर घराच्या वरील मजल्यावर रुममध्ये निघून गेली.नंतर जेवणासाठी तिला आईने आवाज दिला असता तिने प्रतिसाद न दिल्याने त्यांनी वर जाऊन पाहिले असता, दरवाजा आतून बंद होता. खिडकीतून डोकावून पाहिले असता पूजा छताच्या पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.
रुमचा दरवाजा तोडून तिला उतरविण्यात आले.तिला सुरुवातीला खासगी दवाखान्यात नेले असता डॉ. संदीप जोशी यांनी मृत घोषित केले. यानंतर तिचा मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला, सोमवारी सकाळी तिचे शवविच्छेदन करून शहापूर येथे तिच्या मूळगावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत पूजाचा भाऊ मयूर राजेंद्र पाटील याने अमळनेर पोलिसात दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, पूजाच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही, पूजा ही शहापूर शाळेचे मुख्याध्यापक आर.डी.पाटील यांची कन्या आहे. एमएस्सी मॅथ्सपर्यंत पूजाचे शिक्षण झाले होते.दरम्यान, एकाच महिन्यात अमळनेर येथे युनियन बँकेचे कर्मचारी सागर पाटील व आता पूजा पाटील अशा दोन तरुणांच्या आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.