जळगाव : धुळे येथील एका महाविद्यालयात पदवी परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांस कॉपी करण्यास मज्जाव केल्यामुळे संबधित विद्यार्थ्याने प्राध्यापकास तलवार काढून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर १ एप्रिल रोजी घडली. या प्रकरणी संबधित प्राध्यापकाने जिल्हा पोलीस अधीक्षक व धुळे शहर पोलीस ठाण्यात देखील तक्रार केली आहे.या प्राध्यापकाने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, धुळे शहरातील त्यांच्या महाविद्यालयात विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या पदवीच्या परीक्षेदरम्यान १ एप्रिल रोजी परीक्षेचे कामकाज पाहत असलेल्या पर्यवेक्षकाने एका विद्यार्थ्याला कॉपी करताना हटकले तसेच कॉपी करण्यास त्याला मज्जाव केला. तसेच संबधित प्राध्यापकाने वरिष्ठ पर्यवेक्षकांच्या लक्षात देखील हा प्रकार आणून दिला. त्यानंतर पेपर संपल्यानंतर संबधित विद्यार्थी महाविद्यालयातील कॅँटीनमध्ये तलवार घेवून आला व त्याने प्राध्यापकाला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी संबधित प्राध्यापकाने प्राचार्यांकडे तक्रार केली. तसेच ४ एप्रिल रोजी देखील त्या विद्यार्थ्याने वर्गात येवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही प्राध्यापकाकडून सांगण्यात आले आहे.याआधीही चार जणांना धमक्याया विद्यार्थ्याची संपूर्ण महाविद्यालयात दहशत असल्याचे म्हटले जात आहे. तसेच याआधीही २०१४ मध्ये देखील उपप्राचार्या व इतर प्राध्यापकांनी याच विद्यार्थ्यांविरोधात प्राचार्यांकडे तक्रार केली होती. तेव्हाही परीक्षेदरम्यान या विद्यार्थ्याने गोंधळ घातला होता. ८ मार्च २०१८ रोजी देखील या विद्यार्थ्याने एका प्राध्यापकास कॅँटीनमध्ये मारहाण केली होती. याबद्दल पोलिसांकडे तक्रार दिली होती. या विद्यार्थ्याची तक्रार करून देखील महाविद्यालय प्रशासनाने या विद्यार्थ्यावर कुठलीही कारवाई केली नसल्याचे प्राध्यापकाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.विद्यापीठाकडे धुळ्याबाबत कुठलीही तक्रार आलेली नाही. अन्य ठिकाणची तक्रार आली होती. तिथे जाऊन चौकशी केली आहे.- बी.बी.पाटील, कुलसचिव
कॉपी करण्यास मज्जाव केल्याने विद्यार्थ्याची प्राध्यापकाला धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 14:57 IST