लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : प्रत्येक तहसील कार्यालयात ऑनलाइन नावे समाविष्ट करण्याच्या नावाखाली गरिबांची लूट केली जात आहे. ही लूट थांबवून संपूर्ण तक्रारींची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अल्पसंख्याक सेवा संघातर्फे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, प्रत्येक तालुक्यात ऑनलाइन नावे समाविष्ट करण्याच्या नावाखाली घोळ निर्माण केला आहे. दरम्यान, जळगाव शहरात नाव समाविष्ट किंवा कमी करण्याचे काम हे अमळनेर येथील एका व्यक्तीकडून करून घेण्यात येत आहे. मुक्ताईनगरची ऑनलाइनची कामे रावेर येथील व्यक्ती रावेरला बसून करत आहे. असाच प्रकार इतर तालुक्यांत सुरू आहे. त्यामुळे गोरगरिबांच्या कामाला विलंब होत आहे तसेच आर्थिक लूट केली जात आहे. त्यामुळे गरिबांची होणारी लूट थांबविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना अल्पसंख्याक सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष जहाँगीर खान, प्रदेश उपाध्यक्ष याकुब खान, जिल्हा उपाध्यक्ष अकबर काकर, हुसेन खान आदींची उपस्थिती होती.