जळगाव - शहरातील इच्छादेवी चौक ते शिरसोली नाक्यादरम्यान मनपाकडून अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. मात्र, यामुळे अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या नागरिकांच्या रोजंदारीवर परिणाम होणार असून, मनपाने ही मोहीम रद्द करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे करण्यात आली आहे. याबाबत गुरुवारी मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले. यावेळी नागेश वारूळे, प्रवीण वाघ, सिद्धार्थ गव्हाणे, अनिल नन्नवरे, अक्षय मेघे, दिनेश सोये, गोलू सोनवणे, पंकज सोनवणे, किरण चव्हाण, प्रवीण ससाणे, सतीश सोनवणे, आदी उपस्थित होते.
कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव
जळगाव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात आता कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कापसाचे नुकसान होत असून, यामुळे शेतकऱ्यांचा एकूण उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. यासह सोयाबीनचे पीकदेखील खराब होत असल्याचे दिसून येत आहे.
शहरात ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी
जळगाव : शहरात गुरुवारी सायंकाळी सहा वाजता ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर शहरात कमी असला तरी मात्र तालुक्यातील आव्हाणे, खेडी, वडनगरी या भागात मात्र तब्बल तासभर दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचले होते. तसेच वीज पुरवठादेखील काही काळासाठी खंडित झाला होता.
रस्त्याचा कामाला सुरुवात
जळगाव : शहरातील के. सी. पार्क परिसरातील रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. बांधकाम विभागाकडून या रस्त्याचे काम केले जात असून, शिवाजीनगरकडील रस्त्याचेही काम करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तालुक्यातील २९ गावांना जोडणारा हा रस्ता असून, नवीन सिमेंटच्या रस्त्याचे काम होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.