लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सर्वत्र कोरोनाचा हाहाकार सुरू असून अशा स्थितीत स्वत:चे मानसिक व शारीरिक स्वास्थ टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यात तुमची प्रतिकारक्षमता जेवढी सशक्त तेवढा तुम्हाला धोका कमी, त्यामुळे धुम्रपान व मद्यपानापासून लांब राहावे, पौष्टिक आहार घ्यावा, झेपेल तेवढा व्यायाम करावा, असा सल्ला औषधवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.भाऊराव नाखले यांनी दिला आहे.
कोविड विषाणू हा फुफ्फुसांवर हल्ला करीत असल्याने ते अधिकाधिक निरोगी ठेवण्यासाठी व तुमची प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी आहार, योगा व पुरेसा व्यायाम आवश्यक असल्याचे डॉ. नाखले यांनी म्हटले आहे. अनेक रुग्णांना प्रतिकारशक्ती चांगली असल्यानेच केवळ या रोगापासून सुरक्षा मिळू शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.
काय खावे
आहारामध्ये पालेभाज्या व फळभाज्यांचा समावेश अधिक करावा, विशेषत: आंबट फळे आवळा, संत्री, मोसंबी, आंब्याचे पन्हे यांचे सेवन करावे
आहारामध्ये तुळशीची पाने, आले, हळद, लसून, मीरी, दालचिनी यांचा वापर अधिक असावा. साखरे ऐवजी गुळाचा वापर करावा,
फळांमध्ये द्राक्षे, पपई यांचे सेवन करावे. जेवणात दही खावे
काय करू नये
रात्रीचे जागरण करू नये, पुरेशी झोप आवश्यक, अतिव्यायाम करू नये, धुम्रपान, मद्यपानापासून लांबच रहावे, धुम्रपानाचा थेट प्रभाव हा फुफ्फुसांवर होत असल्याने ते टाळावे, मानसिक त्रास घे्ऊ नये, प्रवास शक्यतोवर टाळावा, बाहेर जाताना मास्क घालावे, दुसऱ्यांपासून अंतर ठेवूनच बोलावे, फ्रीज मधील थंडे पाणी पिऊ नये, कोमट पाणीच प्यावे, अन्य व्याधींची औषधी बंद करू नये