जळगाव : नागपूर सुरत महामार्गावर अमरावती ते नवापूर या दरम्यानच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला महिनाभरात सुरुवात होईल, अशी माहिती महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली.
शहरात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. खडसे म्हणाले, या रस्त्याच्या संदर्भात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा झाली आहे. काँक्रीटीकरण करून हे चौपदरीकरण केले जाईल. पाच हजार ६00 कोटी रुपये एवढा खर्च या प्रकल्पासाठी येईल, असेही ते म्हणाले. अमरावती ते नवापूर दरम्यानच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी ४ हजार कोटींची निविदा एल अँण्ड टीने घेतली होती. करार मोडल्याने प्रकल्पाची किंमत वाढली आहे.
पूर्वी अमरावती ते जळगाव आणि जळगाव ते नवापूर असे दोन टप्प्यात काम होणार होते. ते आता अमरावती ते चिखली, चिखली ते धुळे आणि धुळे ते नंदुरबार अशा तीन टप्प्यात होणार आहे. अमरावतीपासून तर गुजरातच्या सिमेपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी पुन्हा एकदा निविदा प्रसिद्ध करण्यात येत असून तीन महिन्यात महामार्गाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा (नही)चा प्रयत्न राहणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाची प्रक्रिया दोन वर्षापूर्वी हाती घेण्यात आली होती. त्यासाठी एल.अँण्ड टी कंपनीला वर्षभरात महसूल विभागाने ८0 टक्के जमीन देणे आवश्यक होते.
मात्र विहित कालावधित कंपनीच्या ताब्यात जमीन सोपविण्यात न आल्याने कंपनीने वाढीव मोबदल्याची मागणी केली होती. ती मागणी केंद्र सरकारने मान्य केली नाही. त्यामुळे 'नही' व एल अँण्ड टी यांच्यात झालेला करार मोडला गेला. परिणामी आता महामार्गाच्या कामासाठी पुन्हा एकदा निविदा काढण्याची प्रक्रिया सुरु आहे. चौपदरीकरणाच्या उद््घाटनाला नितीन गडकरी येणार अमरावती नवापूर या दरम्यानच्या चौपदरीकरणाच्या कामाच्या उद््घाटनासंबंधी नितीन गडकरी या महिन्यात येणार आहे. त्यांच्याहस्ते मुक्ताईनगरात या कामाचे उद््घाटन होईल. तसेच मुक्ताई सहकारी साखर कारखान्याच्या हंगामाची सुरुवात त्यांच्याहस्ते होईल. या महिन्यात १६ किंवा १८ तारखेला गडकरी येण्याची शक्यता आहे. परंतु अजून अधिकृत दौरा जाहीर झालेला नाही.