दापोरा, ता.जळगाव : तालुक्यातील दापोरा येथील गिरणा नदीपात्रातील सन २०२१-२२ चा वाळू गटाचा लिलाव करण्यासाठी तहसीलदार जळगाव यांच्या २६ ऑगस्ट रोजीच्या पत्रानुसार ग्रामसभेला शिफारस पाठविण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार दापोरा ग्रामपंचायतीने ९ रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले आहे.
गिरणा नदीपात्रात जेमतेम वाळू साठा शिल्लक असून, वाळूच नसल्याची परिस्थिती आहे. लिलाव झाल्यास मोठ्या प्रमाणात नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे. दापोरा गावात सर्वत्र केळीचे बागायती क्षेत्र असल्याने नदीपात्रातील वाळूमुळे जमिनीतील पाणीसाठा टिकवून ठेवण्यास मदत होते आणि गावातील मुख्य रस्त्यावर जि.प. प्राथमिक शाळा असल्याने अपघात होण्याची शक्यता असते, अशा वेळी वाळू लिलावास ग्रामस्थांचा विरोध आहे.
पाच वर्षांपासून दापोरा येथील वाळूचा लिलाव नाहीच
दापोरा येथील गिरणा नदीपात्रातील वाळू साठ्याचा लिलाव करण्यासाठी प्रशासनाकडून ग्रामसभेची शिफारस मागण्यात येते. मात्र, वाळू लिलावामुळे नुकसान होणार असल्याने ग्रामस्थांकडून विरोध केला जातो. त्यासोबत जेमतेम वाळूचा साठा शिल्लक असल्याने पर्यावरण विभागाचा अहवालदेखील प्रतिकूल येत असल्याने दापोरा येथील वाळू गट लिलाव प्रक्रियेतून वगळण्यात येतो.
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष
दापोरा येथील गिरणा नदीपात्रातून अजूनही काही प्रमाणात अवैध वाळूचा उपसा होत असल्याने यावर अजूनही ग्रामपंचायतीचे पदाधिकारी कोणताही विरोध न करता फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याची परिस्थिती आहे. मागील आठवड्यात ‘लोकमत’च्या वृत्तानंतर ग्रामदक्षता समितीची बैठक झाली. त्यात वाळूचा उपसा थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याचे ठरले. मात्र, त्या कधी अमलात येतील याकडे लक्ष लागले आहे. दापोरा येथील ग्रामस्थांकडून गिरणा नदीपात्रातील वाळू लिलावास विरोध असला तरी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी वाळू लिलावाविषयी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.