जळगाव : पावसाची मनभावन विविध रूपे जळगावकरांनी गाण्यातून अनुभवण्यासाठी गंधार कला मंडळाचा ‘मन चिंब पावसाळी’ हा कार्यक्रम नुकताच ऑनलाइन पद्धतीने पार पडला.
यावेळी सुरुवातीला पुणे येथील अश्विनी भट-मदाने यांनी कवी मधुकर जोशी यांचे ‘झिमझिम झरती श्रावणधारा’ हे गीत गायले. त्यानंतर तरुण मनाचा ठाव घेणारे ‘अधीर मन झाले’ हे गीत ‘कराओके’वर स्वरमयी देशमुख हिने सादर केले. ‘ये रे घना ये रे घना’ हे अनुजा मंजूळ हिने गायले.
एवढेच नव्हे तर हिरवाईच्या वैभवाची लयलूट असणाऱ्या श्रावणात कधी ऊन पडते आणि हेच ऊन आपल्याला झेपत नाही. याच आशयाचे ‘एक होता विदूषक’ या चित्रपटातील कविवर्य ना.धों. महानोर यांचे गीत ‘श्रावणाचं ऊन मला झेपेना’ हे श्रुती वैद्य यांनी सुरेल आवाजात गायले. मिया मल्हार रागातील ‘मेघामधूनी कुणी छेडिला आज सखे मल्हार’ हे गीत अमृता कस्तुरे यांनी म्हटले. अखेर मेधा रानडे (पुणे) यांनी कुसुमाग्रजांचे ‘हासरा नाचरा जरासा लाजरा’ हे गीत आणि ‘श्रावणात घननिळा बरसला’ हे गीत श्रुती जोशी यांनी गाऊन कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमासाठी मानिनी तपकिरे, विशाखा देशमुख, वरदा देशमुख आणि प्रणव तपकिरे, मयुरी देशपांडे, सतीश मोघे (मुंबई), केदार गोखले (मुंबई), ज्योती कोल्हटकर (पुणे), तसेच मिलिंद देशमुख आदींनी परिश्रम घेतले.