जिजाबराव वाघ
चाळीसगाव, जि. जळगाव : समाजाने दातृत्वाची ओंजळ धरली तर कोरोना महामारीतही काय क्रांतिकारी गोष्ट घडू शकते, याचा प्रत्यय चाळीसगाव शहरापासून अवघ्या आठ किमी अंतरावर पूर्वेला असणाऱ्या पातोंडा या गावात आला. गोकुळ परभत भील व कदमबाई भील या मध्यमवयीन दाम्पत्यासह तीन दिव्यांग मुलांचेही पूर्ण पुर्नवसन झाले आहे. या परिस्थितीने पिचलेल्या कुटुंबाला निवारा तर मिळालाच. रोजगारही उपलब्ध झाला आहे. सोमवारी भील दाम्पत्याला दहा शेळ्या सुपूर्द करण्यात आल्या.
कोरोनाने अनेकांची रोजीरोटी हिरावली. मजुरांच्या झोपडीतील चुली विझल्या. काहींना याच कोरोनाने रस्त्यावर आणले. पातोंडा येथील गोकुळ भील आणि कदमबाई भील हे कुटुंबही कोरोनाच्या सावटात आले. त्यांचा रोजगार बुडाला. एक वेळ अशी आली की, दोन मुले अनुक्रमे १७ व ११ वर्षीय तर २४ वर्षीय मुलगी हे भुकेने व्याकुळ झाले. घरात काहीच नसल्याने चार दिवस चूल पेटली नाही. अशा स्थितीत या कुटुंबाना स्वयंदीप दिव्यांग भगिनी मंडळाच्या प्रमुख मीनाक्षी निकम यांनी सोशल माध्यमावर मदतीचे आवाहन केले. याला प्रतिसाद देत बीडीओ नंदकुमार वाळेकर यांनी भील कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना दत्तक घेतले.
............
चौकट
घर उभे राहिले, शेळ्यांचा गोठाही तयार झाला
वाळेकर यांनी या कुटुंबाला शासनाच्या मदतीची गरज पडू नये असा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी समाजही पुढे आला. सैनिकांच्या ग्रुपने भील कुटुंबाचे पडके घर उभारून दिले तर दीपक निकम या वीज कर्मचाऱ्याने थकीत वीजबिल भरून घरात विजेचा प्रकाश प्रसवला. काहींनी धान्य व किराणा भरून दिला. वर्षभर पुरेल इतके किराणा सामानही मिळाले आहे.
1...आ. बं. विद्यालयातील इयत्ता दहावीच्या बॕॅचसह, गुणवंत सोनवणे मित्रपरिवाराने कुटुंबासाठी ४० हजाराची मदत मिळवून दिली.
2...गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी स्वतः व विस्तार अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी, ग्रा.पं.सदस्यांच्या मदतीने ५२ हजार रुपयांचे संकलन केले.
3. याच ९२ हजारांच्या रकमेतून गोकुळ भील यांना १० शेळ्या घेऊन दिल्या.
4..पातोडा ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच यांच्यासह सदस्यांनी शेळ्यांसाठी गोठा उभारून दिला. कदमबाई यांच्या डोळ्यांमधील मोतीबिंदूचे आॕपरेशन तर तीनही दिव्यांग मुलांसाठी शासनाच्या बालसंगोपन योजनेव्दारे मदत मिळवून देण्यासाठीही बीडीओ यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
.......
‘लोकमत’चाही खारीचा वाटा
गोकुळ परभत भील यांच्या दुर्दैवी आणि दयनीय परिस्थितीचा हुंदका लोकमतनेही मांडला होता. यामुळे या कुटुंबाची व्यथा सर्वदूर पोहचली. समाजमनाच्या संवेदना पाझरल्या. कुटुंबाच्या पुनर्वसनात लोकमतचाही खारीचा वाटा आहे, अशी प्रतिक्रिया नंदकुमार वाळेकर व मीनाक्षी निकम यांनी व्यक्त केली.
.......
इन फो
माणूसरूपी देव भेटले
मी माणसांच्या रूपात आज देव पाहत आहे. कोरोनात रोजगार बुडाल्यानंतर हताश झालो होतो. तीन दिव्यांग मुलांसह पत्नीचे पोट कसे भरायचे, हा प्रश्न डोंगराएवढा झाला होता. घर पडून गेले होते. वीज नव्हती. आज देवरूपी माणसांनी आम्हाला नव्याने जगण्याची ऊर्जा दिली आहे.
- गोकुळ परभत भील
पातोंडा, ता. चाळीसगाव.