चिखलामुळे वाहनधारकांची गैरसोय
जळगाव : व. वा. वाचनालयाकडून जिल्हा परिषदकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे मोठ्या प्रमाणावर चिखल झाला आहे. ठिकठिकाणी पाणी तुंबल्यामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत असून, दररोज या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. तरी मनपा प्रशासनाने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनधारकांमधून केली जात आहे.
जागेवरून प्रवाशांमध्ये वाद
जळगाव : शुक्रवारी रात्री जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ एक्सप्रेसच्या जनरल बोगीमध्ये जागेवरून दोन प्रवाशांमध्ये वाद झाल्याचा प्रकार घडला. जळगावच्या प्रवाशाचे आरक्षण असतानांही, नागपूरहून येणाऱ्या प्रवाशाने जागा न दिल्यामुळे हा वाद उद्भवला. मात्र, इतर प्रवाशांनी नागपूरच्या प्रवाशाला समज देऊन उठविल्याने, या वादावर पडदा पडला. दरम्यान, प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, जादा डबे जोडण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
राष्ट्रीय मूलनिवासी संघातर्फे सोमवारी आंदोलन
जळगाव : शासनाच्या निर्णयामुळे एससी, एनटी, एसबीसी समाजातील नागरिकांचे आरक्षण संपुष्टात येणार आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघातर्फे १९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान ते तहसील कार्यालयापर्यंत बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे. तरी शासकीय व निमशासकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.