बोदवड : जिल्ह्यात सर्वात पहिले कोरोनामुक्त झालेल्या बोदवड तालुक्यात १४ रोजी केलेल्या तपासणीत सहा जण बाधित आढळले आहेत. यामुळे तीन दिवसांत ही संख्या आता ११ झाली आहे. हे सर्व रुग्ण हे भानखेडा येथील आहेत. गावात आतापर्यंत ४०० रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
बोदवड तालुक्यातील भानखेडा येथे शुक्रवारी ३५ ते ४० ते चाळीस वयोगटातील पाच नागरिक कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यात दोन महिला, तीन पुरुषांचा समावेश होता.
तालुका आरोग्य विभागाने तत्काळ दखल घेत गावात सरपंच यांच्यामार्फत फवारणी करून घेतली. त्यानंतर गावात विलगीकरणामध्ये असलेल्या पाचही नागरिकांना ग्रामीण रुग्णालयात दक्षता म्हणून हलवण्यात आले आहे.
गावात तपासणी मोहीम सुरू केली असता त्यात आजपावेतो चारशे नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात अगोदर पाठवलेल्या अहवालात आणखी सहा नवीन रुग्ण आढळून आले. त्यात ही दोन महिला, चार पुरुष आहे. त्यांचे वय चाळीस ते पंचेचाळीसच्या वयोगटातील असून गावात जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात आरोग्य विभागाने लसीकरण सुरू केले आहे. गावात तीनशेच्या वर नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे, तर अगोदर पाच रुग्णसंख्या असलेल्या भानखेडा गावात आता सहा रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता बाधित संख्या ११ झाली आहे.
या सर्वांचे अहवाल पुणे येथील प्रयोगशाळेकडे नवीन डेल्टा प्लसच्या तपासणीसाठी ही पाठवण्यात आले आहेत. याबाबत आज गावात तहसीलदार प्रथमेश घोलप, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी मनोज चौधरी व आरोग्य पथकाने भेट दिली. गावात लसीकरण व तपासणीचे कॅम्प लावण्यात आले आहे.
बोदवडला डेंग्यूचे रुग्ण
दुसरीकडे बोदवड शहरात डेंग्यूने आपले हातपाय पसरविण्यात सुरुवात केली आहे. शहरातील प्रभाग क्र. सहामध्ये १९ वर्षीय तरुण तसेच प्रभाग क्र. दहामधील महिलेस डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील नागरिकांच्या आरोग्याकडे नगरपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी फवारणी करण्याची गरज आहे.
कोट
नागरिकांनी मास्क, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर या पद्धती बंद करू नये. त्याचप्रमाणे काही लक्षणे असल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी, अंगावर काढू नये. अतिदक्षता म्हणून कोरोनाबाधित आढळलेल्या या रुग्णांना भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटरला हलविण्यात आले आहे.
- डॉ. मनोज चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी, बोदवड