पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन हिरालाल लालवाणी हे कापड दुकानावर कामाला असून पत्नी खुशी व दोन वर्षांचा मुलगा रौनित यांच्यासह सिंधी कॉलनीत वास्तव्याला आहेत. ९ ऑगस्टपासून पत्नी मुलासह माहेरी गावाला गेलेली असताना २० ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता पवन दुकानावर गेले. पैशाची गरज भासल्याने सायंकाळी घरी गेले असता कपाटातील पत्नीचे १२ ग्रॅम वजनाचे २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, २ हजार रुपये किमतीचे सोन्याचे १ ग्रॅमचे पान व रोख २२ हजार ५०० असा ऐवज गायब झालेला होता. दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पवन यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली होती, त्यानुसार गुन्हा दाखल झाला होता.
निरीक्षकांचा संशय ठरला खरा
गुन्ह्यात बनावट चावीचा वापर झाल्याने पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना तेथेच संशयाची पाल चुकचुकली. त्यामुळे त्यांनी पवन लालवाणी यांच्याकडून कौटुंबिक माहिती जाणून घेत असतानाच भारत व सासरा अनिल यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड निघाले. अनिलवर जळगावसह इतर जिल्ह्यात घरफोडीचे २० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आल्यानंतर शालक भारत याचेदेखील गुन्हेगारी रेकॉर्ड समोर आले. त्यामुळे शिकारे यांनी याच पिता-पुत्रावर लक्ष केंद्रित केले आणि चौकशीत त्यांचा संशयही खरा ठरला. सहायक फौजदार अतुल वंजारी, सचिन मुंडे, इम्रान सय्यद, गोविंदा पाटील व सचिन पाटील यांनी केलेल्या चौकशीत हा प्रकार भारत याने केल्याचे स्पष्ट झाले. तो उल्हासनगर येथून जळगावला घरी येत असल्याची माहिती मिळाल्यावर या पथकाने सकाळीच त्याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली देतानाच लॉकेट काढून दिले. बाकीचे दागिने त्याने बँकेत तारण ठेवल्याचे समजले. बहिणीच्या दागिन्यांवर भावाने डल्ला मारल्याचा प्रकार उघड झाला. भारत याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.