रावेर येथे आज श्रीकृष्ण- दत्त रथोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 06:05 PM2019-12-12T18:05:50+5:302019-12-12T18:05:58+5:30

सुमारे १८१ वर्षांची प्रदीर्घ परंपरा

Shri Krishna- Dutt Rathotsav today at Raver | रावेर येथे आज श्रीकृष्ण- दत्त रथोत्सव

रावेर येथे आज श्रीकृष्ण- दत्त रथोत्सव

Next


रावेर : श्री दत्तस्वरूप सच्चिदानंद स्वामींनी श्री दत्तजयंती निमित्ताने मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदेनिमीत्त रूढ केलेला ‘श्रीकृष्ण-दत्त रथोत्सव १३ रोजी साजरा होत आहे. या रथोत्सवाला सुमारे १८१ वर्षांची प्रदीर्घ परंपरा आहे.
या उत्सवाला शहरवासीयांसह खान्देश तथा निमाड प्रांतातील श्री दत्तभक्त परिवाराचा वर्षानुवर्षांपासून मिळणारा उदंड प्रतिसाद मिळतो. देश-परदेशात नोकरी वा व्यवसायानिमित्त विखुरलेल्या रावेरकरांचे तथा सासरी गेलेल्या माहेरवाशीणांचे पाय आपसूकच रावेरकडे वळत असल्याने या नगरोत्सवाला एक यात्रोत्सवाचे उधाण आले आहे. ब्रिटिशांनी मोडीत काढलेल्या एका मुघलकालीन किल्ल्याचा लाकडी इमला वापरून १८३५ च्या सुमारास येथील दत्त मंदिराची उभारणी करण्यात आली. दरम्यान, स्वामींनी एकमुखी दत्तप्रभूंची १७ इंच उंचीची मूर्ती घडवून घेत प्रतिष्ठापना केली. दत्तस्वामींनी आरंभ केलेल्या रथानंतर त्यांचे शिष्य रामभाई बेटावदकर यांनी साधारण २१ फूट उंच असलेला अष्टमुखी व सुमारे सात ते आठ टन वजनाचा नवीन उंच रथ समर्पित केला.
नवीन रथासाठी बरेच साहित्य बोहरा समाजातील एका भक्ताने दान दिल्याचे सांगण्यात आले. स्वामी सच्चिदानंद महाराजांनी दत्त मंदिरातच संजीवन समाधी घेतली. त्यांच्या परंपरेत दुसरे गादीपती म्हणून माधवनाथ महाराज, तिसरे केशवदास महाराज, चौथे भानुदास महाराज तर पाचवे गादीपती म्हणून श्रीपाद महाराज सेवारत आहेत. रथावरील श्रीकृष्ण मूर्ती व श्री दत्त प्रभूच्या निर्गुण पादुकांचे पूजन व सेवा बजावण्याची परंपरा राजगुरू परिवार बजावत असून, रामचंद्र राजगुरू, विकास राजगुरू, धनंजय राजगुरू, विशाल राजगुरू सेवा बजावत आहेत.

Web Title: Shri Krishna- Dutt Rathotsav today at Raver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.