जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील शिवकॉलनी पुलावर शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास कचरा वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये बिघाड झाला. त्यामुळे पुलावर झालेल्या वाहतुकीच्या कोंडीमुळे दोन्ही बाजूला एक किलो मीटरपर्यंत वाहनांची रांग लागली होती. यामुळे तब्बल एक तास हा महामार्ग ठप्प झाला होता.
दुपारी मनपाच्या वाहनाने (क्र. एमएच १९ सीवाय ४५५०) आयटीआयजवळून कचरा उचलला. त्यानंतर हे वाहन कचरा फॅक्टरीकडे जात असताना अचानक शिवकॉलनी पुलावर वाहनाचे मागील चाकाचे टायर फुटले आणि वाहन महामार्गावर थांबले. यामुळे मागून येणारी संपूर्ण वाहतूक अडकून पडली. नेहमी वाहनांची वर्दळ असलेल्या या महामार्गावर दहा ते पंधरा मिनिटांतच पुलाच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतुकीची कोंडी होत असल्याने ट्रकचालकाने इतर सहकाऱ्यांच्या मदतीने लागलीच चाक बदलण्यास सुरुवात केली.
वाहनांच्या लागल्या रांगा...
दुचाकीस्वारांनी मध्येच वाहने घुसवल्याने वाहतूक कोंडी अधिकच वाढली होती. त्यातच वाहतूक पोलिसांनी हजेरी लावल्यानंतर महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत झाली. तसेच वाहनाचे चाक बदलविण्यात आल्यानंतर कचरा संकलनाचे वाहन पुन्हा आपल्या मार्गावर मार्गस्थ झाले. परंतु, तासभर वाहतुकीचा खोळंबा झाला होता.