जळगाव : शिवसेना शिंदे गटाच्या जळगाव जिल्हाप्रमुख पदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आलेली आहे. या संदर्भातील शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्या स्वाक्षरीचं एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या पत्रासंदर्भात शिवसेनेच्या जळगावातील काही स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता त्यांनी या माहितीला दुजोरा दिलाय.
गेल्या मंगळवारी म्हणजेच, 14 जानेवारी रोजी शिवसेना शिंदे गटाच्या जळगाव जिल्हाप्रमुख पदी नव्यानेच पक्षात दाखल झालेले विष्णू भंगाळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्ती संदर्भातील पत्र शिवसेना शिंदे गटाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी दिलं होतं. विष्णू भंगाळे यांची नियुक्ती विद्यमान जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांच्या जागी करण्यात आलेली होती. हा फेरबदल करण्यात आल्यानंतर पक्षात मोठ्या प्रमाणावर अंतर्गत कुजबूज सुरू होती.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी मोठ्या प्रमाणावर काम करूनही जिल्हाप्रमुख पदावरून बाजूला केल्याने निलेश पाटील नाराज झाले होते. त्यांनी आपली नाराजी थेट पक्षश्रेष्ठींकडे होती. जिल्हाप्रमुख नियुक्तीचे अधिकार हे उत्तर महाराष्ट्र प्रमुख असलेले भाऊसाहेब चौधरी यांना नसल्याचा मुद्दा देखील मांडला होता. त्यानंतर आज 21 जानेवारी रोजी शिवसेना शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांनी जळगाव जिल्हाप्रमुख नियुक्तीला पुढील आदेश येईस्तोवर स्थगित करत असल्याचे आदेश दिल्याची सूत्रांची माहिती आहे. यासंदर्भातील एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
विष्णू भंगाळे हे विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी ठाकरे गटाचा राजीनामा देऊन शिवसेना शिंदे गटात दाखल झाले होते. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जळगाव त्यांचा पक्षात प्रवेश झाला होता. विष्णू भंगाळे हे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख होते. त्यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त करून शिंदे गटात प्रवेश केला होता. पक्षात आल्यानंतर लगेचच त्यांनी जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती मिळवली होती. परंतु त्यांची ही नियुक्ती वादात सापडली आहे.