सावखेडा ग्रामपंचयतीचे दुर्लक्ष : रहिवाशांना विकतचे घ्यावे लागतेय पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील बांभोरी परिसरातील महामार्गाला लागून असलेल्या बिबा नगरात गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे. मनपा व सावखेडा ग्रामपंचायतीतर्फे पिण्याच्या पाण्याची कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे रहिवाशांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.
बिबा नगर परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती वाढली. मात्र, आजही येथील पाणी, रस्ते, गटारी व पथदिव्यांच्या समस्या जैसे थे आहे. यातील पाण्याची समस्या गंभीर बनली असून, नागरिकांना उन्हाळ्यात विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. सावखेडा ग्रामपंचायतीतर्फे या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन टाकण्यात आलेली नसल्यामुळे नागरिकांना बोअरवेलचे पाणी वापरावे लागत आहे. उन्हाळ्यात बोअरवेलही आटत असल्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी अधिकच फिरफिर होत आहे. तसेच या ठिकाणी रस्ते व गटारींची सुविधा नसल्यामुळे नागरिकांना अधिकच गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात तर या ठिकाणी चालण्यासाठी रस्ताही राहत नसल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
उन्हाळ्यात तर तीव्र पाणी टंचाई
पाणी टंचाईबाबत येथील रहिवाशांनी सांगितले की, वर्षानुवर्षे या ठिकाणी पाण्याची समस्या आहे. रहिवाशी बोअरवेलच्या पाण्याचा उपयोग करतात. मात्र, उन्हाळ्यात हे पाणीही कमी होते. त्यामुळे पाण्यासाठी फारच फिरफिर करावी लागते. विशेष म्हणजे पिण्याच्या पाण्याचे खूपच हाल होतात. नागरिकांना विकतचे पाणी आणावे लागते, हे पाणी आणतांना खूप त्रास सहन करावा लागतो. दरवर्षी ही नित्याचीच समस्या झाली आहे. तक्रारी करूनही लोकप्रतिनिधी यांनी पाण्याची समस्या सोडविली नसल्याची खंत येथील रहिवाशांनी ''लोकमत''कडे व्यक्त केली.
इन्फो :
मनपा किंवा सावखेडा ग्रामपंचायतीतर्फे पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन न टाकल्यामुळे बोअरवेलचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागते. उन्हाळ्यात तेही पाणी कमी होते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होतात. मनपा व लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
वंदना काळे, रहिवासी
गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात पिण्याच्या पाण्यासह रस्ते व गटारींचीही समस्या सुटलेली नाही. मनपाचे व लोकप्रतिनिधी यांचे येथील समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. पावसाळ्यात तर या ठिकाणी चालण्यासाठीही रस्ता नसतो.
सुनिता सोनवणे, रहिवासी
गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना बोअरवेलचे पाणी वापरावे लागत आहे. उन्हाळ्यात बोअर वेलचेही पाणी कमी होत असल्यामुळे,पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या बाबत अनेकदा नागरिकांनी तक्रारी करूनही मनपा प्रशासनाने दखल घेतलेली नाही.
मनिषा बडगुजर,रहिवासी
इन्फो :
मनपातर्फे पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्यामुळे खूप हाल होत आहेत. तसेच या ठिकाणी रस्ते, गटारींचीही व्यवस्था नाही. यामुळे नागरिकांना खूपच गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. असे असतानाही ,मनपा प्रशासन किंवा सावखेडा ग्रामपंचायतीतर्फे पाण्याची समस्या सोडविण्यात आलेली नाही.
शशिकलाबाई भोरे, रहिवासी