जिजाबराव वाघचाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव पंचायत समिती तालुक्यातील मेहुणबारे गणाच्या पोटनिवडणुकीसाठी सात महिला उमेदवार आखाड्यात असून २३ जून रोजी मतदान होणार आहे. भाजपच्या सदस्या रुपाली पीयूष साळुंखे यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली असून, भाजप आणि राष्ट्रवादीत चुरस वाढली आहे. पंचायत समितीमधील पक्षीय बलाबल व आॅगस्टमध्ये सभापतीपदासाठी जाहीर होणारे आरक्षण पाहता पोटनिवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे. २४ जून रोजी तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.भाजपच्या सदस्या रुपाली साळुंखे यांचे दहा महिन्यांपूर्वी निधन झाले होते. तेव्हापासून ही जागा रिक्त असून, राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसोबतच ही पोटनिवडणूक होत आहे. १७ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या निवडणुकीत रुपाली साळुंखे यांनी मेहुणबारे गणावर भाजपचा झेंडा रोवला होता. आॅगस्टमध्ये सभापतीपदासाठी नव्याने आरक्षण जाहीर होण्याची शक्यता पाहता या पोटनिवडणुकीला वलय प्राप्त झाले आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने विजयासाठी कंबर कसली आहे. १० रोजी माघारीच्या दिवशी कुणीही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने सात जणांमध्ये हा सामना आता रंगणार आहे.राष्ट्रवादी-भाजप आमनेसामनेचाळीसगाव तालुक्यात पंचायत समितीचे एकूण १४ सदस्य आहेत. दीड वर्षापूूर्वी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपचे प्रत्येकी सात सदस्य विजयी झाले होते. सभापती व उपसभापती निवडीच्या वेळी नाट्यमय घडामोडीनंतर राष्ट्रवादीला तांत्रिक चूक भोवली. त्यांचे दोन्ही अर्ज बाद झाले. यामुळे भाजपला सभापती व उसभापतीपदाची एकप्रकारे लॉटरी लागली. सद्य:स्थितीत सभागृहात भाजपचे सहा तर राष्ट्रवादीचे सात सदस्य असे पक्षीय बलाबल आहे.पं.स.वरील सत्तेचा झेंडा कायम ठेवण्यासाठी भाजपला ही पोटनिवडणूक महत्वाची आहे. असे असले तरी राष्ट्रवादीने येथे बाजी मारल्यास त्यांना थेट सत्ता काबीज करण्याची संधी आहे. भाजपचा विजय झाल्यास पक्षीय बलाबल समान होईल, तर राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर झाल्यास त्यांचे आठ सदस्य होऊन बहुमताचा काटा त्यांच्याकडे झुकेल.पोटनिवडणुकीच्या आखाड्यातील उमेदवारसुनंदा सुरेश साळुंखे- भाजपस्वाती मधुकर पाटील- अपक्षरत्नाबाई राजेंद्र अमृतकार-अपक्षजयश्री नरेश साळुंखे- राष्ट्रवादीमायाबाई मिलिंद पारेराव- अपक्षअनिता गोपीचंद पाटील- अपक्षनंदाबाई लुभानराव जगताप- अपक्ष
चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे गणाच्या निवडणुकीत सात महिला रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 18:44 IST