जामनेरला पोलिसांच्या ताब्यात
महिलांकडील वस्तू चोरणाऱ्या मराठवाड्यातील
सात अल्पवयीन मुली जामनेरला पोलिसांच्या ताब्यात
जामनेर : बाजारातील गर्दीचा फायदा घेत महिलांचे मंगळसूत्र, मोबाइल व पर्स लांबविणाऱ्या सात अल्पवयीन मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या मुली भोकरदन, सिल्लोड व जालना परिसरातील आहेत. त्यांना जळगाव येथील निरीक्षणगृहात पाठविल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून गर्दीच्या ठिकाणी महिलांवर पळत ठेवून त्यांचे मंगल सूत्र, मोबाइल, पर्स आदी मौल्यवान वस्तू लांबविल्या जात असल्याच्या घटना वाढल्या होत्या. केकतनिंभोरा येथे अशीच घटना घडली होती. गुरुवारी जामनेरचा बाजार असल्याने सध्या वेशातील पोलिसांनी पळत ठेवून अशा सात मुलींना संशयावरून ताब्यात घेतले. या सर्व ६ ते १० वयोगटांतील असल्याचे पोलिसांनी सांगितले. पालकांची नावे त्या सांगत नाही.
या मुली बाजारात महिलेकडे वस्तू लांबविल्यानंतर जवळच थांबलेल्या पालकांकडे स्वाधीन करतात. जर पकडले गेलो तरी वस्तू मिळत नसल्याने कारवाईची शक्यता कमीच असते. इतक्या लहान वयात या मुली या मार्गाकडे का वळल्या असाव्यात याचे कोडे पोलिसांनाही पडले आहे.