चोपड्यातील नितीन चौधरींची करामत : पीलबागेचे व्यवस्थापन करून खर्च कमी करण्यावर दिला भर
अजय पाटील
कृषी दिन विशेष
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शेतीमध्ये शेतकऱ्यांकडून सातत्याने रासायनिक खतांचा वापर करून शेतीची गुणवत्ता कमी होत जात आहे. यामुळे उत्पादनावरदेखील मोठा परिणाम होत आहे. भविष्यात रासायनिक खतांचा वापर अशाचप्रकारे होत राहिला तर सुपीक जमीन सापडणे कठीण होऊन जाईल. रासायनिक शेतीचा धोका ओळखून शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथील रहिवासी, मात्र चोपडा येथे वास्तव्याला असलेल्या नितीन धर्मराज चौधरी यांनी केळीच्या पीलबागेची लागवड करून त्यात सेंद्रिय खतांचा वापर करून, कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेण्याची करामत केली आहे. तसेच सेंद्रिय शेतीसाठी युवकांनी पुढे यायला पाहिजे यासाठीदेखील चौधरी चोपडा तालुक्यातील ग्रामीण भागात काम करीत आहेत.
कृषी शाखेचे पदवीधर असल्याने नितीन चौधरी यांनी पिकांचे योग्य व्यवस्थापन करीत चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे. लॉकडाऊनच्या काळातदेखील नितीन चौधरी यांच्या शेतातील केळीला बाजारात ५०० ते ६०० रुपये क्विंटल इतका दर मिळाला. खोडवा व्यवस्थापनाचे नियोजन करून, चौधरी चांगले उत्पन्न घेत इतर शेतकऱ्यांनादेखील यासाठी प्रेरणा देत आहेत.
असे केले नियोजन
१. चौधरी यांनी चार एकरातील लागवड सहा बाय पाच फूट अंतरात केली. सुमारे सहा हजार झाडांची लागवड या बागेत केली. अशाप्रकारे लागवड केल्याने काढणी ही ९० टक्क्यांपर्यंत झाली. तसेच पीलबागेतील झाडांची संख्या ९५ टक्क्यांवर राखता आली. लागवड केल्यानंतर त्यांनी २०० लीटर पाण्यात पालापाचोळा कुजविणारे जिवाणू, संवर्धक ३ लीटर मिसळून केळीच्या अवशेषांवर शिंपडले.
२. योग्य वेळेत कुजून जमिनीचा सेंद्रिय कस वाढण्यास मदत झाली. खर्च कमी करण्यासाठी केवळ दोन वेळा बेसल डोस देण्यात आले. यानंतर आवश्यकतेनुसार खते व पाण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच ड्रीपरची पाणी देण्याची क्षमतादेखील प्रती तास चार लीटर एवढी केली. त्यात पीलबाग पावसाळ्यात मोठा काळ राहतो, त्यामुळे सिंचनाव्दारे पाणी देण्याची फारशी गरज पडली नाही.
सेंद्रिय खतांचा वापर करून, एकरी वाचला १८ हजारांचा खर्च
पीलबाग केळीमुळे पुनर्लागवड, पूर्वमशागत व मजुरीचा खर्च वाचला. त्यात नांगरणी, रोटाव्हेटर, बेड निर्मितीचा एकरी किमान २८०० रुपये खर्च वाचला. तसेच घरीच २०० लीटर पाण्यात पालापाचोळा कुजविणारे जिवाणू, संवर्धक ३ लीटर मिसळून लावगडीसाठी वापरली. तसेच जीवामृतांचा वापर करून, इतर खतांचा वापर टाळला. यामुळे रासायनिक खतांचा इतर खर्चदेखील वाचला. एकरी १८ हजारांचा खर्च वाचल्याची माहिती नितीन चौधरी यांनी दिली. तसेच जमिनीतील ऑरगॅनिक कार्बनची वाढ होऊन फळ देखील चांगले येते व उत्पादन देखील चांगले मिळते. शेतकऱ्यांनी व्यवस्थापन, नियोजनाचा वापर केल्यास शेती चांगला व्यवसाय ठरू शकतो असेही चौधरी सांगतात.