लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोकणातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रशासकीय नियोजनातून जळगावच्या सेवारथ संस्थेने मदतीचा हात पुढे केला आहे. एक लाखांच्या औषधींसह जीवनावश्यक वस्तू तसेच स्वच्छतेचे मोठे साहित्य घेऊन दोन वाहने बुधवारी दुपारी चार वाजता चिपळूणकडे रवाना होणार आहे. यात दोन डॉक्टरांसह १८ जणांची टीम आठवडाभर त्या ठिकाणी मदत कार्य करणार असल्याची माहिती सेवारथ संस्थेचे डॉ. रितेश पाटील यांनी दिली.
कोकणात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्त हानी झाली आहे. जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थिती राज्यभरातून या ठिकाणी मदतीचे आवाहन होत आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचा कोकणातील स्थानिक प्रशासनाशी संपर्क झाल्यानंतर त्यांच्या माहितीनुसार जिल्हाधिकारी राऊत यांनी सेवारथ संस्थेला साहित्याबाबत सांगितले. त्यानुसार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने साहित्य जमा करून ते त्या ठिकाणी रवाना करण्यात येणार आहे. क्रीडा संकुलापासून दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत हे मदतीचे वाहन कोकणात रवाना होणार आहे.
असे आहे साहित्य
५०० लीटर फिनाईल, ५०० किलो तुरटी, १५ हजार सॅनिटरी नॅपकीन, २५०० चटई, १५ हजार नवीन साड्या, १ हजार नवीन ड्रेस, ५०० मोजे, दीड क्विंटल चिवडा, बिस्किटांचे पुडे, स्वच्छतेसाठी ३०० खराटे यासह विविध साथीच्या आजारांवरील १ लाख रुपयांची औषधी, ५०० जीवन ड्रॉप, हॅण्डग्लोज, मास्क आदी साहित्यासह दोन अद्यावत अशा सर्व सुविधायुक्त रुग्णवाहिका दोन डॉक्टरांसह १८ जणांची टीम हे सर्व साहित्य घेऊन त्या ठिकाणी मदतकार्य करणार आहे.
स्थानिक प्रशासनाला हात
स्थानिक प्रशासन सेवारथच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने स्थानिक पातळीवर मदतकार्य करणार आहे. त्या ठिकाणी सात ते आठ गावांमध्ये हे मदत कार्य पोहचवून स्वच्छतेचे कार्य करणार असल्याचे डॉ. रितेश पाटील यांनी सांगितले. दरम्यान, दात्यांनी नवीन कपडे, स्वच्छतेचे साहित्य, जीवनावश्यक वस्तूंची मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.