लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मुंबई ते नागपूरदरम्यान धावणाऱ्या सेवाग्राम एक्स्प्रेसला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे, रेल्वे प्रशासनाने ही गाडी १९ मेपासून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे गुजरात येथे सुरू असलेल्या चक्रीवादळामुळे रद्द करण्यात आलेल्या चार एक्स्प्रेस गाड्या १८ मेपासून पुन्हा त्यांच्या नियोजित वेळापत्रकानुसार धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
सध्या राज्यात संचारबंदी लागू असल्याने याचा परिणाम रेल्वेच्या प्रवासी संख्येवरही झाला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने गेल्या आठवड्यात जळगाव रेल्वे स्टेशनवर थांबा असलेल्या चार सुपरफास्ट गाड्या रद्द केल्यानंतर, आता पुन्हा विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी असलेली मुंबई- नागपूर (गाडी क्रमांक ०२१६९-७०) ही गाडीदेखील बुधवारपासून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीला सध्या कोरोनामुळे व राज्यात लागू असलेल्या संचारबंदीमुळे प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावर बोटावर मोजण्या इतक्याच प्रवाशांकडून तिकीट बुकिंग करण्यात येत आहे. त्यामुळे अपेक्षित उत्पन्नही मिळत नसल्यामुळे रेल्वे प्रशासनाने ही गाडी रेल्वे बोर्डाचे पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
इन्फो :
‘त्या’ चार गाड्या आजपासून पूर्ववत
‘तौउते’ या चक्रीवादळामुळे रेल्वे प्रशासनातर्फे जळगावमार्गे गुजरातकडे जाणाऱ्या चार रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये गाडी क्रमांक (०९२०६) हावडा पोरबंदर एक्स्प्रेस, गाडी क्रमांक (०८४०१) पुरी ओखा एक्स्प्रेस, गाडी क्रमांक (०९०९४) पोरबंदर एक्स्प्रेस व गाडी क्रमांक (०९२३८) राजकोट -रेवा एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश होता. हे वादळ थांबल्यामुळे या गाड्या मंगळवारपासून पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.
इन्फो :
डाऊनची ओखा एक्स्प्रेस बंद राहणार
या चक्रीवादळामुळे रेल्वे प्रशासनातर्फे अप मार्गावरच्या गाड्या सुरू करण्यात आल्यानंतर, डाऊन मार्गावरची गाडी क्रमांक (०८४०२) ही गाडी चक्रीवादळामुळे मात्र १९ मे रोजी बंद ठेवण्यात आली आहे. अशी माहिती भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे कळविण्यात आली आहे.