बेवारस बॅगमुळे रेल्वे स्टेशनवर खळबळ जळगाव : येथील रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक 3 व 4 च्या मधील रुळांवर बुधवारी एक बेवारस बॅग आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. आरपीएफच्या जवानांनी पुढाकार घेऊन बॅग उघडून पाहिल्यानंतर त्यात बॉम्ब नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सर्वानी सुटकेचा निश्वास सोडला. गाडी क्रमांक 12628 ही कर्नाटक अप गाडी दुपारी अडीच वाजता रेल्वे स्टेशनवर आली. पाच मिनिटे थांबून गाडी मुंबईकडे रवाना झाल्यानंतर रुळाजवळ एक बेवारस बॅग आढळून आली. काही प्रवाशांनी हा प्रकार आरपीएफचे निरीक्षक गोकुळ सोनोने यांच्या लक्षात आणून दिला. सोनोने यांनी लागलीच उपनिरीक्षक एस.पी. यादव, सहायक फौजदार हयद खान व कॉन्स्टेबल ए.ए. खान यांना सोबत घेवून प्रत्यक्ष घटनास्थळ गाठले. ही बॅग कर्नाटक एक्सप्रेसमधील एका प्रवाशाने ठेवल्याचे काही प्रवाशांनी सांगितल्याने अधिकच भीती निर्माण झाली. बॅग उघडल्यानंतर कचरा गोळा करणा:या एका व्यक्तीने ती बॅग माझीच असून तेथे ठेवून दुसरीकडे प्लॅस्टीक घेण्यासाठी गेलो होतो असे सांगितले. याच दरम्यान, अजमेर हैदराबाद, गोवा व गितांजली एक्सप्रेस रवाना झाली होती.
बेवारस बॅगमुळे रेल्वे स्टेशनवर खळबळ
By admin | Updated: September 24, 2015 00:59 IST