लोकमत न्यूज नेटवर्क
कासोदा, ता. एरंडोल : ७५ व्या म्हणजे अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त येथे शाळकरी विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शन भरविले होते. यात शेतीच्या माती परीक्षणासह चंद्रावरील खड्डे व डाग दाखविणारी दुर्बीण घरातीलच टाकाऊ वस्तुंपासून बनवून सर्वांना आश्चर्यचकित केले.
सुरुवातीला ध्वजवंदन व भारतमातेचे पूजन सुमित व जितेंद्र अहिरे या सैनिकांचे हस्ते करण्यात आले. नंतर येथील लीटल व्हॅली या शाळेतील विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शन भरविले होते.
त्यात टाकाऊ वस्तुंपासून टिकाऊ वस्तू तयार करण्यावर भर देण्यात आला होता, यात पवनचक्कीपासून विद्युत निर्मिती करण्यात आली होती. मोनाली पाटील, मानसी सूर्यवंशी, रेणुका खैरनार या इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
माती परीक्षण आणि शेती उत्पादन क्षमतेवर उपाययोजना यावर हर्ष, वेदांत, सिद्धेश, हर्षदा यांनी प्रयोग सादर केले, तसेच स्वस्तात टेलिस्कोप, सॅनिटायझेशन, फूड टेस्टिंग, हायड्रोफोनिक फार्मिंग, वॉटर कूलर, एअर हायड्रोलिक यूज असे अनेकाविध प्रोजेक्ट क्रिष्णा, वेदांत, मयूर, मयंक, सुमित, कुणाल, अमृता, निसर्गा, रुचिका, स्वाती, सायली यांनी तयार केले.
भविष्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सॅनिटायझर बॅग, ऑक्सिजन निर्मितीही हे विद्यार्थी येथे करीत होते. सर्व मुले शेतकऱ्यांचीच असल्याने स्वतःच्या शेतातील माती परीक्षण करून पालकांना मातीत कोणते घटक कमी आहेत, याची माहिती देत होते. जमिनीतील खडक परीक्षण, खडकांचे प्रकार व महत्त्व याबाबत माहिती देत होते. यशस्वितेसाठी अशोक पाटील, ललित पाटील, ओम नवालसह शाळेतील इतर शिक्षकांनी परिश्रम घेतले.