लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांचे निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे. विद्यार्थ्यांचा निकाल एसएमएस, दूरध्वनी व इतर ऑनलाइन पद्धतीने पालकांना कळविण्यात येणार आहे. बहुतांश इंग्रजी शाळांनी १ मे रोजीच निकाल जाहीर केले. विशेष म्हणजे, यंदा उत्तीर्ण ऐवजी गुणपत्रकावर वर्गोन्नतीचा शेरा असणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद होत्या. परिणामी, विद्यार्थ्यांची शाळांमध्ये उपस्थिती नव्हती. मूल्यमापन करणे शक्य नसल्यामुळे विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला. पण, निकाल कसा तयार करावा, हा संभ्रम शिक्षकांमध्ये होता. नंतर निकालाच्या तीन पद्धती शिक्षण विभागाकडून सुचविण्यात आल्या होत्या. त्यानुसार निकाल तयार करण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांकडून ऑनलाईन पद्धतीने पालकांना निकाल उपलब्ध करून दिला जात आहे. बहुतांश शाळांनी निकाल सुद्धा जाहीर केले आहेत. सरसकट पास करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्याच्या गुणपत्रकावर उत्तीर्ण ऐवजी वर्गोन्नतीचा शेरा दिला दिला जात आहे. जिल्हा परिषद शाळांकडून सुद्धा विद्यार्थ्यांच्या पालकांच्या व्हॉट्सॲपवर निकाल पाठविला जात आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे ॲन्ड्रॉईड मोबाईल नाही, अशा पालकांना एसएमएस पाठवून किंवा संपर्क साधून निकाल कळविला जात आहे.