जळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा २१ दिवसीय संघशिक्षा वर्ग १३ पासून येथे सुरु होत आहे. त्यानिमित्ताने सरसंघचालक मोहन भागवत १३ व १४ रोजी त्यात सहभागी होण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी शहरात येत आहेत. त्याची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. सावखेडा शिवारातील विवेकानंद प्रतिष्ठान संचलित शाळेच्या भव्य वास्तूत आणि प्रांगणात सकाळी ४ ते रात्री १० या वेळात हा निवासी वर्ग होणार आहे. त्यात महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमधील सुमारे ४५० निवडक पदाधिकारी, कार्यकर्ते यात सहभागी होतील. संघ शिक्षा वर्गात सकाळी शारिरीक शिक्षण, दुपारी विविध विषयांवर बौद्धिक, गटश: चर्चा, सायंकाळी संघशाखा आणि नंतर बौद्धिक गटश: चर्चा होईल. प्रबोधन, विविध प्रश्नी संघाचे धोरण आदींचाही त्यात समावेश असेल. प्रथम वर्षासाठी ४० वर्ष वयाच्या वरील स्वयंसेवक असतील. त्यांच्यासाठी गोवंश रक्षण व संवर्धन, रुग्णसेवा इ. विषय असतील. द्वितीय वर्षासाठी ४० वर्ष वयाच्या आतील स्वयंसेवक (महाविद्यालयीन विद्यार्थी व विविध स्तरातील) असतील, त्यांच्यासाठी शारिरीक शिक्षण, प्रबोधन, संघरचना, तिचे बळकटीकरण इ.विषय असतील, अशी माहिती मिळाली. दरम्यान, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या जळगाव दौर्याचा कार्यक्रम जिल्हा पोलीस प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यांना झेड प्लस सुरक्षा असल्याने पोलीस प्रशासनाकडून ताफ्याची तयारी करण्यात आली आहे. १३ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास त्यांचे जळगावात आगमन होणार आहे. त्यानंतर ते बुधवारी व गुरुवारी संघशिक्षा वर्गाला उपस्थित राहणार आहे. सरसंघचालकांचा ज्या ठिकाणी मुक्काम राहणार आहे त्या ठिकाणी सुरक्षेसाठी पोलीस कर्मचार्यांची नियुक्ती असणार आहे. त्यानंतर गुरुवार १५ मे रोजी रात्री ते मुंबईकडे रवाना होणार आहेत.
सरसंघचालक मंगळवारी शहरात
By admin | Updated: May 12, 2014 18:36 IST