भुसावळ: शहराजवळील साकेगाव येथे सरपंच पती विष्णू सोनवणे यांच्यासह १५ जणांना डेंग्यूची लागण झाली असून ते भुसावळ येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. आरोग्य विभागाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन उपाय योजना करणे गरजेचे आहे.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. कधी पाऊस तर कधी कडक ऊन यामुळे अनेक नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. खोकला, अंगदुखी, सर्दी, तापाचे रुग्ण दिवसागणिक वाढताना दिसत आहे.
उपाय योजण्याची गरज
आरोग्य विभागाकडून गावात कंटेनर सर्वेक्षण सह ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामध्ये फवारणी करणे आवश्यक आहे. नागरिकांनी सभोवतालच्या परिसरामध्ये पाणी साचू न दिल्यास डेंग्यूस नक्कीच आळा घालण्यासाठी मदत होईल.
तर डेंग्यू रुग्णांची स्थिती तालुक्यातील अनेक गावामध्ये सारखीच असल्याचे माहिती समोर येत आहे.
आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळणे गरजेचे
गावामध्ये अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचले आहे. याशिवाय अनेक घरांमध्ये अनेक दिवसांपासून टाक्या आणि भांड्यात पाणी साठवण करून ठेवलेले आहे. अशा ठिकाणी या डासांची उत्पत्ती होते. ही बाब लक्षात घेता डेंग्यूचा नायनाट करण्यासाठी कोरडा दिवस पाळण्याची गरज आहे.