लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पाळत ठेवून पाठलाग करीत बुलेटवरून आलेल्या तिघांनी गणेश दुलाराम महाजन (४५, रा. गाडगेबाबा चौक, महाबळ) या हॉटेल व्यावसायिकाच्या पोटाला पिस्तूल लावून ४० हजार रुपये लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांत तक्रार दिली तर जिवंत ठेवणार नाही, अशी धमकीही या तिघांनी महाजन यांना दिली. मंगळवारी रात्री ९.३० वाजता घडलेल्या या घटनेची महाजन यांनी भीतीपोटी दोन दिवस तक्रारच दिली नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतर गुरुवारी सकाळीच पोलिसांनी तिघांना अटक केली.
गणेश महाजन यांचे बसस्थानक परिसरात साई गजानन नावाने हॉटेल आहे. मंगळवारी रात्री हॉटेल बंद करून ते दुचाकीने घरी जायला निघाले असता महाबळ कॉलनीत बाहेती शाळेजवळ बुलेटवरून आलेल्या तिघा जणांनी महाजन यांना ओव्हरटेक करून दुचाकीच्या पुढे आडवे झाले. त्यापैकी एकाने महाजन यांना दुचाकीवरून खाली उतरायला लावून पोटाला पिस्तूल लावत तुझ्याजवळ किती पैसे आहेत ते काढ असे धमकावले. महाजन यांनी नाही..नाही म्हटले असता दुसऱ्याने जबरदस्तीने खिशात हात टाकून ४० हजार रुपये काढून घेतले. जाताना शिवीगाळ करून पोलिसांत तक्रार दिली तर तुला जिवंत ठेवणार नाही, मारून टाकू अशी धमकी देत तिघे जण निघून गेले. यापैकी एकाचे नाव अरबाज दाऊद पिंजारी असे असून त्याला आपण ओळखत असल्याचे महाजन यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
रात्रीच केली धरपकड
या तिघांनी हॉटेलपासूनच पाळत ठेवून गणेश महाजन यांचा पाठलाग केला. तिघेजण गुन्हेगार असल्याने जीवाचे बरे वाईट होऊ शकते, म्हणून आपण पोलिसांत उशिरा तक्रार दिल्याचे महाजन यांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी रात्रीतूनच अरबाज दाउद पिंजारी (२५, रा .हरिविठ्ठल नगर), अरबाज रऊफ खाटीक (२२) व मुदस्सर सलीम खाटीक (२५, रा.तांबापुरा) या संशयितांची धरपकड केली. त्यांना अटक करण्यात आली असून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी या गुन्ह्याचा तपास करीत आहे.