नशिराबाद : येथे गावातील प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडले असल्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच नवीन वस्त्यांमध्ये तर रस्त्यावरच चिखलाचे साम्राज्य असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे तर या रस्त्यांची वाट लागली आहे. चिखल झालेल्या रस्त्यांवर मुरूम टाकण्यात यावा, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस ललित बराटे यांनी नगर परिषदेचे प्रशासक नामदेव पाटील यांच्याकडे केली आहे.
नवीन प्लॉट एरिया, द्वारका नगर, मुक्तेश्वर नगर, भवानी नगर, न्यू इंग्लिश स्कूल परिसर तसेच नव्याने वाढलेल्या वस्त्या त्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे चिखलमय रस्ता निर्माण झाला आहे. त्यावर तत्काळ मुरूम टाकून उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
आसारी देते अपघाताला आमंत्रण
गावातील प्रमुख काँक्रीटच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालवणे मुश्कील होत आहे. काही ठिकाणी तर सिमेंट काँक्रीटमधील आसारीच वर आल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पोलीस स्टेशनसमोरील रस्त्यावर व बसस्थानकाकडून युनियन बँकेकडे जाणाऱ्या रस्त्यावर आसारी वर आल्यामुळे वाहनांची चाके पंक्चर होण्याचे प्रमाण वाढले आहे. युनियन बँकेसमोर तर मोठ्या प्रमाणातील खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहे. काही रस्ते तर नुकतेच काही महिन्यांपूर्वीच काँक्रिटीकरण करण्यात आलेले आहेत. मात्र, त्यांचे पितळ अवघ्या काही दिवसांतच उघडे पडले आहे. गावातील सर्वच लोकप्रतिनिधी या मार्गावरून ये-जा करतात. मात्र, याबाबत सर्व जण गप्प का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.