कॉफी आणि बरंच काही...हे ऐकलंय मात्र, याऐवजी सध्या रस्ते, खड्डे, तलाव अन् बरंच काही....हे आम्ही पाहतोय...जळगावातील रस्त्यांची अवस्था ही ड्रोनमध्ये टिपल्यानंतर आपण दुसऱ्या ग्रहावर फिरतोय का याचा भास होतो...असे अनेक मिम्स रोज सोशल मीडियावर फिरतात...मात्र, हा भास अस्तित्वात किती भयंकर रूप घेऊ शकतो, हे रस्त्यावरील पाण्याचा अंदाज न येता खड्ड्यात पडून कावराबावरा झालेल्या वाहनचालकाला विचारा...‘मौत का कुआ’ ही कसरत तर सरावाने होते, त्यापेक्षा दुचाकीवर बसून उंटाच्या सफारीचा आनंद घेण्याची जळगावकर वाहनधारकांची कसरत अधिक कौतुकास्पद आहे. रस्त्यावरील खड्डे आहेत की नेमके तलाव आहे, हा फरक ओळखणाऱ्याला खरे तर बक्षीस दिले पाहिजे... खड्ड्यांमध्ये रांगोळी काढणे, खड्ड्यांवरून उड्या मारणे, गुलाबाचे फूल देणे अशी काही आंदोलन झाली, खरी पण कुणाचे वाहन खड्ड्यात पडून खराब झाले किंवा कोणी जखमी झाला त्याला कुणी काही मदत केलीय का? काही आठवतंय तुम्हाला....
रस्ते, खड्डे, तलाव आणि बरंच काही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:12 IST