भुसावळ : तालुक्यातील मांडवादिगरजवळील पोलीस चौकी ते वाघूर नदी दरम्यान महादेव तांडा फाट्यावर रस्ता लुटीचे प्रकार नेहमीच होत असतात. रविवारी मध्यरात्री झालेल्या रस्तालुटीत काही वाहन चालक किरकोळ जखमी झाल्याचे सकाळी उघडकीस आल्याने अप-डाऊन करणाऱ्या वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, १३ च्या मध्यरात्री ११.३० वाजेच्या दरम्यान भुसावळ-जामनेर रस्त्यावरील मांडवादिगर जवळील पोलीस चौकी ते वाघूर नदीजवळील महादेव तांडा फाट्यावर रस्ता लूट करणाऱ्यांनी रस्त्याच्या मध्यभागी लोखंडी खाट टाकून उर्वरित रस्त्यामध्ये दगड ठेवून जाणाऱ्या ट्रकच्या कांचा फोडून नुकसान केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली. या दरम्यान १ ते ४ दुचाकीस्वार सुद्धा किरकोळ जखमी झाल्याची माहिती नागरिकांनी दिली.
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांशी साधला संपर्क
रस्ता लुटीच्या प्रकरणासंदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीशी चारचाकी चालकाने संपर्क साधून झालेल्या घटनेची माहिती दिली. यानंतर लागलीच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्याशी संपर्क साधून रस्ता लुटीबाबत माहिती दिली. अर्धा तास झाल्यानंतरही घटनास्थळी पोलीस अधिकारी व कर्मचारी न पोहोचल्याने शेवटी अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधताच जामनेर पोलीस ठाण्याचे अधिकारी १५ मिनिटांत घटनास्थळी पोहोचले.
अप्पर पोलीस अधीक्षकांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला
नागझिरा फाट्याजवळ सुरू असलेल्या रस्ता लुटीची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना मिळताच पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी भरत काकडे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली असता तब्बल १५ मिनिटात जामनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश धुगे,सुनील माळी, होमगार्ड पथक हे गावातील नागरिकांना हातात लाठ्याकाठ्या घेऊन घटनास्थळी दाखल झाले. यामुळे अधिक प्रकार टळला.
गावकऱ्यांनी गारखेडा जवळ वाहने थांबविली...
रस्ता लूट सुरू असल्याची माहिती आजूबाजूच्या गावातील नागरिकांना मिळाल्याने नागरिकांनी जामनेर वरून भुसावळकडे जाणारी वाहने अर्धा तास थांबवून पोलीस अधिकारी आल्यानंतर जाण्यास चालकांना सांगितले होते.
भुसावळ पोलिसांनी फिरविली पाठ ...
नागझिरा फाट्याजवळ रस्ता लुटीचा प्रकार सुरू असल्याची माहिती दिल्यानंतर भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे व तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी मध्यरात्री घटनास्थळी न पोहचल्याने तसेच एकही कर्मचारी न पाठविल्याने या प्रकरणाकडे जणू पाठ फिरविल्याचे दिसत आहे.