आनंद सुरवाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरात कोरोना रुग्णसंख्या अगदी झपाट्याने वाढत असताना कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात १५ एप्रिल ते १६ मेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यात अजून सक्ती करण्यात आली आहे. मात्र, आधीचा हा कडक निर्बंधांचा लॉकडाऊन कोरोना रोखण्यासाठी फायदेशीर ठरले आहे. मार्च-एप्रिल या महिन्याच्या तुलनेत एप्रिल-मे या लॉकडाऊनच्या काळात रुग्णसंख्या ५,३७९ने घटली आहे.
जिल्हाभरात १५ फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट दाखल झाली होती. मार्च महिन्यात मोठी बिकट परिस्थिती जिल्हाभरात निर्माण झाली होती. त्यानंतर एप्रिल महिन्यातील पहिले दोन आठवडे कायम राहिली होती. त्यानंतर तिसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या घटत असून, मे महिन्यात नियमित आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या घटून १०००पेक्षा कमी समोर येत आहे. आता ही संख्या ६००वर आली आहे.
जळगाव शहरात दिलासा
अन्य तालुक्यांच्या तुलनेत सुरुवातीला शहरात सर्वाधिक रुग्ण समोर येत होते. मात्र हळूहळू ही संख्या कमी होत गेले. आता ही संख्या अगदी ५०च्या खाली आली आहे. गेल्या चार दिवसांपासून शहरात १००पेक्षा कमी रुग्ण समोर येत असून, त्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शहरातील बाधितांचे प्रमाणही घटले आहे. मार्च महिन्यात आणि एप्रिलच्या सुरुवातीला हे प्रमाण अगदी ४५ टक्क्यांवर पोहचले होते, तेच प्रमाण आता ८ ते १० टक्क्यांवर आले आहे.
वैयक्तिक पातळीवर सुरक्षा महत्त्वाची
प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला असला तरी वैयक्तिक पातळीवर स्वत:ची काळजी घेतली गेल्यास कोरोना संसर्ग रोखण्यात आपोआप मदत होइल, असे डॉक्टर सांगतात. दुसऱ्या लाटेत अगदी नवीन लक्षणे, नवीन बाबी समोर आल्या आहेत. ही लाट सुरुवातीला अगदी सौम्य वाटत असताना मध्यंतरी मात्र, अत्यंत भयावह झाली होती.
लक्षणे असलेले घटताय
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांचा पॅटर्न पुन्हा बदलत आहे. त्यात आता लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या अधिक समोर येत आहे. सुरुवातीला हाच पॅटर्न होता, मात्र, मार्च-एप्रिल या दरम्यान, गंभीर व लक्षणे असलेले रुग्ण वाढले होते. मेमध्ये पुन्हा हे चित्र बदलले आहे.
१५ मार्च ते १५ एप्रिल दरम्यानचे रुग्ण : ३४,४५१
१५ मार्च ते १५ एप्रिल दरम्यानचे मृत्यू ४१३
लॉकडाऊनचा असा होता महिना
रुग्ण २९,०७२
बरे झालेले ३०,१५६
मृत्यू ५४९
चाचण्या २,६५,८५५
शहरातील रुग्ण ४,५८१
शहरातील मृत्यू १०१
पॉझिटिव्हिटी १०.९३ टक्के
लाॅकडाऊनच्या आधी
एकूण रुग्ण १,०६,०७०
एकूण बरे झालेले रुग्ण ९२,८७३
एकूण मृत्यू १,८६८
चाचण्या ७,७३,१७०
शहरातील एकूण रुग्ण २७,५९२
शहरातील एकूण मृत्यू ४४३
लॉकडाऊननंतर
एकूण रुग्ण १,३५,१४२
एकूण बरे झालेले १,२३,०२९
एकूण मृत्यू २४१७
चाचण्या १०,३९,०२५
शहरातील एकूण रुग्ण ३२,१७३
शहरातील एकूण मृत्यू ५४४