नगरसेवकांना झटका : २९ महिन्यांचे मानधन थकीत
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव -महापालिकेच्या नगरसेवकांचे मानधन ७५०० वरून १० हजार रुपयांपर्यंत करण्यासाठी फेब्रुवारी २०१६ मध्ये करण्यात आलेला ठराव शासनाकडून विखंडित करण्यात आला आहे. याबाबत नगरविकास मंत्रालयाकडून मनपाला पत्र प्राप्त झाले आहे. बुधवारी झालेल्या महासभेत नगरसचिव सुनील गोराणे यांनी ही माहिती दिली. यासह मनपाच्या जागा ठरावीक व्यक्तींना भाडे पट्ट्यावर देण्याचा ठराव देखील शासनाकडून निलंबित करण्यात आला आहे.
नगरसेवकांच्या मानधनात वाढ झाल्यास मनपाच्या तिजोरीवर भार पडणार असल्याने हा ठराव विखंडित करण्यात आला आहे. तत्कालीन खाविआच्या काळात हा ठराव करण्यात आला होता. नगरसेवकांना नागरिकांच्या तक्रारी व समस्या सोडविण्यासाठी तसेच प्रभागात येत असलेल्या कामांच्या अडचणींबाबत वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावासाठी मनपात जावे लागते तसेच दूरध्वनी व भ्रमणध्वनीचा बराच खर्च करावा लागतो, असे नगरसेवकांचे मत होते. मात्र, हा ठराव आता शासनाने विखंडित केला आहे. नगरसेवकांच्या मानधनात वाढ केल्यास वर्षाला १ कोटी ४४ लाख ९६ हजार रुपयांचा आर्थिक भार महापालिकेला मानधनापोटी पडणार असल्याचे प्रशासनाने मध्ये शासनाला कळवले होते. दरम्यान, मनपाच्या ७० हून अधिक नगरसेवकांचे २९ महिन्यांचे मानधन थकीत आहे.