भाजप नगरसेवक अपात्र प्रकरण : गटनेते नियुक्तीप्रकरणी भाजप न्यायालयात ?
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पक्षविरोधी भूमिका घेतलेल्या भाजपच्या २७ नगरसेवकांच्या अपात्रतेप्रकरणी दाखल याचिकेनुसार नगरसेवकांना भेटलेल्या नोटीसीनंतर बुधवारी २७ नगरसेवकांनी विभागीय आयुक्त कार्यालयात हजेरी लावली. तसेच विभागीय आयुक्तांनी बजावलेल्या नोटीसीला उत्तर देण्यासाठी नगरसेवकांनी अजून आठवडाभराची मुदतवाढ मागितली असल्याची महिती ॲड. दिलीप पोकळे यांनी ‘लोकमत’ला दिली. वकिलांच्या मार्फत नगरसेवक आपली बाजू मांडणार असल्याचीही माहिती या नगरसेवकांकडून देण्यात आली आहे.
मार्च महिन्यात महापौर - उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मतदान न करता भाजपच्या २७ नगरसेवकांनी बंडखोरी करून, शिवसेनेला मतदान केले होते. त्याविरोधात भाजपने या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी नाशिक विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली होती. आठवडाभरापूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून या नगरसेवकांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. तसेच आपली बाजू मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली होती. त्यानुसार भाजपच्या २७ बंडखोर नगरसेवकांनी बुधवारी विभागीय कार्यालयात हजेरी लावून, आपली बाजू मांडण्यासाठी मुदतवाढ मागून घेतली आहे.
गटनेत्यांचा वाद न्यायालयात ?
भाजप बंडखोर नगरसेवकांनी ठराव करून भाजपच्या गटनेतेपदी ॲड. दिलीप पोकळे यांची नियुक्ती केली होती. तसेच प्रभाग समिती सभापतीपदासाठीच्या निवडणुकीत भाजप नगरसेवकांना व्हीप बजावला होता. याविरोधात आता भाजपने बंडखोर नगरसेवक व गटनेत्यांच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्याची तयारी केली असून, बुधवारी स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील व गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक अरविंद देशमुख यांनी औरंगाबादला जाऊन याबाबत काही विधी तज्ज्ञांशी सल्ला घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दोन दिवसात याबाबत याचिका दाखल करण्यात येणार आहे.