ऑनलाइन लोकमत  जळगाव, दि. 25 - नाशिक  येथे कामानिमित्त गेलेल्या राजंणगाव येथील तरुणाचा मृतदेह मुल्हेर (जायखेडा) ता.सटाणा येथे लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना २४ रोजी सकाळी उघडकीस आली. याबाबत सटाणा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असली तरी  पोलिसांनी घातपाताचा अंदाज व्यक्त केला आहे.
 रांजणगाव येथील जयेश मधुकर गोसावी (वय २५) हा  कामानिमित्त नाशिक येथे राहत होता. २३ रोजी तो नाशिक येथून लग्नानिमित्त मामाकडे जायखेडा ता.सटाणा येथे गेला होता. २४ रोजी सकाळी त्याचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळून आला. वडील मधुकर नीळकंठ गोसावी यांनी सांगितले की  जयेश हा कुटुंबात एकुलता एक होता.  त्याने आत्महत्या केली असे वाटत नाही.  त्याचा घातपात झाला असून पोलिसानी या प्रकरणी सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. जयेशची मोटरसायकल व मोबाईल गायब आहे. त्याच्या पश्चात आजी, तीन काका, आई-वडील असा परिवार आहे. त्याचेवर २४ रोजी रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले.