जळगाव : पीकविमा योजनेंतर्गत तांत्रिक चुकांमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या त्या तीन बँकांवर एक किंवा दोन दिवसांमध्ये गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी बुधवारी दिली. संदर्भात त्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा केली.
पीक विम्याचा संदर्भात आढावा घेण्यासाठी बुधवारी रक्षा खडसे जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या होत्या. यावेळी त्यांच्या व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक झाली. यावेळी जे शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित आहेत, त्यांचा आढावा घेण्यात आला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पीक विमाचा लाभ न देणाऱ्या बँकांवर कारवाई करण्याची मागणी झाली होती. त्याअनुषंगाने ही त्यांनी माहिती जाणून घेतली. त्यावेळी जिल्ह्यातील मुक्ताईनगरातील दोन व खानापुरातील एक अशा तीन बँकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली असल्याचे रक्षा खडसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले व एक ते दोन दिवसात गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तर बँकांना मुदतवाढ देण्यात आली होती, असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
संपूर्ण बाबी तपासल्या जाणार
कान्सन्ट्रेटर संदर्भात डीपीडीसीमध्ये आमदारांकडून सूचना करण्यात आल्या होत्या. दर तसेच टेक्निकल बाबी तपासण्याचे सांगण्यात आले आहे, अशीही माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली. तर या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले जाणार नसून संपूर्ण बाबी तपासल्यानंतर बिले अदा केली जातील, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले असल्याची माहिती त्यांनी दिली.