रावेर १३२ केव्ही वीज केंद्रातून निघालेल्या ११ केव्ही वीज फीडरवर झाडाची फांदी पडून, केर्हाळे फीडरवरील तांत्रिक बिघाडामुळे तर कुठे इन्सुलेटरची गळती झाल्याचे या ना त्या कारणाने गत पाच-सहा दिवसांपासून तब्बल चार-चार तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने भोकरी, कर्जोद, वाघोड व अहिरवाडी ग्रामस्थ तथा शेतकरीवर्गातून तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.
आदिवासी भागात मोहगण वीज उपकेंद्रावर अहिरवाडी, भोकरी व वाघोड गाव शिवाराचा भार टाकल्यास या वीजवाहिनीचे अंतर व वीजदाब कमी होण्यास मदत होणार असल्याने महावितरणने तातडीच्या अत्यावश्यक त्या उपाययोजना करून होणारी ससेहोलपट थांबवावी, अशी मागणी होत आहे.
अहिरवाडी फीडरवर दोन दिवसांपासून झाडाची फांदी तुटून तथा वीजतारा तुटून वीजपुरवठा खंडित झाला होता. खंडित वीजपुरवठा तातडीने सुरू करण्याची उपाययोजना करीत असून, कायमस्वरूपी तोडगा काढण्याबाबत आढावा घेत आहे.
- प्रभुचरण चौधरी, उपविभागीय अभियंता, उपविभाग रावेर, महावितरण