जळगाव : धावत्या रेल्वेतून पडल्याने, रेल्वे रूळ ओलांडताना किंवा इतर कारणांनी रेल्वेचा धक्का लागल्याचे दोन वर्षात २२५ अपघात झाले असून त्यात या लोकांचा जीव गेलेला आहे, त्यातील ७२ जणांची तर ओळखच पटली नाही. त्यामुळे या अनोळखी मृतांच्या नातेवाइकांचा शोध घेतांना रेल्वे पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.
रेल्वेचा अपघात म्हटला की, पोलिसांची कसरत आलीच. रेल्वे रुळावरील मृतदेह आणण्यासाठी सर्वात आधी वाहनाची अडचण येते, थेट घटनास्थळापर्यंत वाहनच जाऊ शकत नाही. गेलेच तर किमान २०० ते ५०० मीटर अंतरापर्यंत वाहन पोहचते. रेल्वे अपघातातील मृतदेहांची अवस्था पाहता रेल्वे पोलिसांना मांसाचे तुकडे गोळा करावे लागतात, हे काम करीत असताना पोलीस नाकीनऊ येतात, मात्र कर्तव्य महत्त्वाचे असल्याने त्याला प्राधान्य द्यावेच लागते. बऱ्याच घटनांमध्ये पोलिसांना मृतदेह ने-आण करण्यासाठी वाहनच मिळत नाही. रात्रीच्यावेळी तर मोठी समस्या निर्माण होते. वाहन न मिळाल्याने काही वेळा तर बैलगाडी, हातगाडी यावर मृतदेह आणण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.
मृतदेहाची ओळख पटविण्यात अनेक अडचणींना सामना करावा लागतो. खिशात आधारकार्ड किंवा काही पुरावा असला तर ओळख पटवायला सोपं जात असली तरी नातेवाइकांशी संपर्क व्हायला खूप अडचणी येतात. रेल्वे अपघातातील मृत शक्यतो दुसरा जिल्हा किंवा राज्यातीलच असतात, त्यामुळे नातेवाइकांना यायला सहज दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. काही मृतदेहांचा चेंदामेंदा झालेला असल्याने त्यांची ओळख पटतच नाही. अंगावरील कपडे, शरीरावरील निशाणी व इतर काही खूण असेल तर त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करावे लागतात, तरी देखील ओळख पटतेच असे नाही. दोन वर्षात तब्बल ७२ मृतांची ओळखच पटली नाही, त्यामुळे रेल्वे पोलिसांनाच या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागले.
७२ मृतदेहांची ओळखच पटली नाही
- लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत २०१९ या वर्षात ५९ तर २०२० या वर्षात १३ असे एकूण ७२ मृतदेहांची शेवटपर्यंत ओळखच पटली नाही. त्यामुळे या मृतदेहांवर शासकीय नियमानुसार तीन दिवस सांभाळून अंत्यसंस्कार करण्यात आले.
- काही मृतदेह तर असे होते की जागेवरच चेहऱ्याचा चेंदामेंदा तर काहींचे शरीर व मुंडके वेगळे अशी होती. बहुतांश मृतदेहांचे मांसाचे तुकडे होते, तरीही घटनास्थळावरच पंचनामा व शवविच्छेदन करण्यात आले. नियमानुसार जी प्रक्रिया आहे, ती पार पाडावीच लागते.
कोट..
अनोळखी मृतदेह सांभाळण्यासह जेथे घटना घडते, तेथे जायला ना सरकारी वाहन ना रुग्णवाहिका मिळते. रात्री-अपरात्री कर्मचाऱ्यांना दुचाकीवरच जाऊन पंचनामा करावा लागतो. अशा वेळी कोणतेच वाहन मिळत नाही. विनवण्या करून व खिशातून पैसे खर्च करून मिळेल त्या वाहनाने मृतदेह रुग्णालयात न्यावा लागतो.
-सुरेश सरडे, पोलीस निरीक्षक, लोहमार्ग पोलीस स्टेशन
२०१९
रेल्वे अपघात :१६५
मृत्यू : ५९
२०२०
रेल्वे अपघात :६०
मृत्यू : १३
--