*पाचोरा पोलिसांच्या सतर्कतेने युवकाचे फुटले बिंग..*
लोकमत न्यूज नेटवर्क
खडकदेवळा, ता. पाचोरा : मित्रांकडून हात उसनवारीवर घेतलेल्या पैशांची परतफेड करण्यासाठी पाचोऱ्यातील युवकाने लुटमार झाल्याचा बनाव करत पोलिसात खोटी फिर्याद दाखल करण्याचा प्रयत्न केल्याची घटना पाचोरा पोलिसांच्या सतर्कतेने उघडकीस आली आहे.
पाचोरा येथील एका कुरिअर कंपनीत कुरिअर बाॅय म्हणून कार्यरत असलेला धीरज विनोद पटवारी (२०, साई पार्क, पाचोरा) हा दि. १ जुलै रोजी दुपारी १२:३० वाजता पाचोरा पोलिस स्टेशनला आला आणि त्याने आपण एका खासगी कुरिअर कंपनीत कार्यरत असून माझ्याकडील कंपनीचे १७ हजार रुपये होते. ते ३ ते ४ अज्ञात इसमांनी माझ्या डोळ्यात व अंगावर मिरची पावडर टाकून लुटमार झाल्याची फिर्याद देत असतानाच ठाणे अंमलदार मुकुंद परदेशी यांच्या मनात धीरजविषयी संशयाची पाल चुकचुकली.
परदेशी यांनी लागलीच धीरज यास सहायक पोलिस निरीक्षक राहुल मोरे यांच्यासमोर उभे केले असता धीरज याने लुटमार झाल्याचा पाढा सुरूच ठेवला. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक विकास पाटील यांनी धीरज याला चार प्रश्न विचारून लुटमारीचा बनाव उघड केला. धीरज याची अंगझडती तसेच त्याच्याजवळ असलेल्या बॅगेची झडती घेतली असता बॅगेत स्थानिक बनावटीची मिरची पावडरची रिकामी पुडी आढळून आली. मिरची पावडर स्थानिक बनावटीची असल्याने पोलिसांनी मिरची पावडरच्या पुडीबाबत चौकशी केली असता मिरची पावडर पुडी ही धीरज यानेच त्याच्या घराजवळील एका किराणा दुकानातून घेतल्याचे निष्पन्न झाले.
धीरज याचे वडील विनोद गणेशमल पटवारी यांना पोलिस स्टेशनला बोलविले असता पोलिसांनी व विनोद पटवारी यांनी धीरजला विश्वासात घेऊन खरे ते सांग, असे सांगितले असता धीरज याने चूक मान्य करत १७ हजार रुपये घरीच आहेत. मी माझ्या मित्रांकडून १० हजार रुपये हात उसनवारीवर घेतलेले होते. ते पैसे मला ३० जूनपर्यंत परत करायचे असल्याने मीच हा खोटा लुटमारीचा बनाव केला, अशी कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी धीरज याचे घरून १७ हजार रुपये हस्तगत केले व संबंधित कुरिअर कंपनीचे सुपरवायझर विजय विनायक पाटील यांना पोलिस स्टेशनला बोलावून १७ हजार रुपये सुपूर्द केले.
अवघ्या दोन तासातच पाचोरा पोलिसांच्या पथकाने बनावट लुटमारीचा पर्दाफाश केला आहे. शहरात यापूर्वीही अशा बनावट लुटमारीच्या व घरफोडी झाल्याच्या फिर्यादी दाखल झालेल्या असून अशा बनावट लुटमारी व घरफोड्यांचाही पाचोरा पोलिस तपास करत आहेत.
010721\img-20210701-wa0083.jpg
मित्रांकडुन घेतलेले पैसे परत देण्यासाठी लुटमार झाल्याचा केला बनाव*
*पाचोरा पोलिसांच्या सतर्कतेने युवकाचे फुटले बिंग..*