जळगाव - वीज बिलाची रक्कम नाणी स्वरूपात भरण्यास ग्राहक तयार असताना सुध्दा महावितरणतर्फे वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याचा प्रकार रामानंद परिसरात घडला. याबाबत महाविरणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
रामानंदनगर परिसरातील तेजश्री अमित जैन यांना मे महिन्यापर्यंतचे १४४० रुपयांचे वीज बिल देण्यात आले. मात्र, ही रक्कम नाणी स्वरूपात स्वीकारण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. रक्कम स्वीकारण्यात टाळाटाळ झाल्यामुळे अखेर त्यांनी महाविरणला पत्र पाठवून रक्कम स्वीकारण्यास विनंती केली. मात्र, तरीही वीज पुरवठा खंडित करण्यात आला. वीज नसल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे नाणी स्वरूपात वीज बिलाची रक्कम स्वीकारून कनेक्शन जोडण्यात यावे, अशी मागणी तक्रार अर्जात करण्यात आली आहे.