कांदा पिकांवर परिणाम
काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कांद्याचे रोप टाकलेले होते, तर काही शेतकऱ्यांनी पूर्वीच कांदा लागवड केली होती. परंतु निसर्गाने साथ न दिल्याने कांद्याचे रोप खराब झाले व लावलेला कांदा देखील खराब झाला आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करत बाहेरगावाहून महागडी कांदा रोप आणून शेतामध्ये लागवड केली आहे. अशी संकटाची स्थिती असताना अधिकारी वर्ग शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहेत. वीज वितरण अधिकारी राहुल पाटील यांनी शेतकऱ्यांना पूर्व सूचना न देता शेती पंपाची वीज खंडित केली आहे. शेतकरी वर्ग हा पुन्हा कर्जाच्या बोजात अडकला आहे.
अगोदर पैसे भरा
कासोदा वीज वितरण विभागाचे अधिकारी राहुल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येकी तीन-तीन हजार रुपये भरणा करावा, तेव्हा शेती पंपाची वीज सुरू होईल. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यापूर्वी सूचना केली होती की, कोणत्याही शेतीची वीजपुरवठा बंद करायचा नाही; परंतु मंत्र्यांच्या या सूचनेला वीज वितरण अधिकारी यांनी केराची टोपली दाखवली आहे. तरी या गोष्टीकडे शासनाने व लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांची व्यथा व अडचणी पाहून शेती पंपाची वीज त्वरित सुरू करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.