शहरातील भुयारी मार्गाजवळ असलेल्या नाल्यावरील अतिक्रमण काढावे म्हणून नगरसेवक भूषण वाघ यांनी गुरुवारी सायंकाळी पाच वाजता रेल्वे भुयारी मार्ग ते शिवाजी महाराज चौक दरम्यान रास्ता रोको करत प्रशासनाला निवेदन दिले होते. यासंदर्भात नगरसेवक भूषण वाघ यांनी २४ जुलै रोजी आंदोलनाचा इशारा दिला होता. या आंदोलनाची दखल घेत पाचोरा नगरपरिषदेने नाल्यांवरील अतिक्रमण काढायला सुरुवात केली होती, परंतु आंदोलन होण्यापूर्वीच आमदार किशोर पाटील यांनी व्यावसायिक व मुख्याधिकारी यांच्यात मध्यस्थी केल्यामुळे अतिक्रमण हटविण्यासाठी व्यापाऱ्यांना एक ते दीड महिन्याचा कालावधी मिळाला आहे.
पाचोरा शहरातील शेतकरी सहकारी संघाजवळ असलेल्या नाल्यावर शहरातील काही व्यावसायिकांनी बेकायदेशीर बांधकाम केले आहे. भविष्यात नाला परिसरात पाणी साचल्यास परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक भूषण वाघ यांच्या निदर्शनास येताच त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. यासंदर्भात आमदार किशोर पाटील यांनी संबंधित व्यावसायिक व नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून अतिक्रमणाबाबत दोन्ही पक्षांच्या बाजू समजून घेण्यात याव्यात, अशी सूचना केल्यावर आंदोलनकर्ते नगरसेवक भूषण वाघ व नगरपालिका मुख्याधिकारी यांचे एकमत झाल्याने या अतिक्रमणास एक ते दीड महिन्याचा कालावधी सर्वानुमते देण्यात आला आहे.
यावेळी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, नगरसेवक भूषण वाघ, नगरसेवक विकास पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. तसेच सुरक्षिततेसाठी पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता.