जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा चौकशी अहवाल प्राप्त होत नाही, तोपर्यंत धरणगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.टी.एस.बिराजदार यांचे वेतन स्थगित करण्यात आले आहे. तसे आदेश उच्च शिक्षण विभागातील सहसंचालक डॉ. सतिष देशपांडे यांनी काढले आहे.
प्राचार्य डॉ. बिराजदार यांच्याविरूध्द त्यांच्याच महाविद्यालयातील प्रा. प्रवीण बोरसे यांच्यासह काही प्राध्यापकांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात तक्रार केली होती. प्राध्यापकांनी प्राचार्यांवर आर्थिक घोटाळा, प्राध्यापकांवर होणारे वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय, स्वतःच्या मुलाची बेकायदेशीर नियुक्ती व महाविद्यालयातील मुक्त विद्यापीठाच्या केंद्रांत आर्थिक अफरातफर केल्याचा ठपका ठेवला होता. याबाबत उच्च शिक्षण विभागातही तक्रार करण्यात आली होती.
विद्यापीठाकडून अहवाल सादर होईना !
तक्रारीची दखल घेवून सहसंचालकांनी प्राचार्य बिराजदार यांच्या विरोधातील तक्रारीची चौकशी करून तसा अहवाल सादर करण्याच्या सूचना विद्यापीठाला केल्या होत्या. मात्र, अद्याप सहसंचालक कार्यालयाला विद्यापीठाच्या चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झालेला नाही. अखेर जोपर्यंत अहवाल प्राप्त होत नाही. तोपर्यंत प्राचार्यांचे वेतन स्थगित करण्याचा निर्णय उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक यांनी घेतला आहे.