भुसावळ : शहरासह ग्रामीण भागात पोलीस प्रशासनाची करडी नजर आहे. शहरातून दोन टोळ्या हद्दपार करण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच १८ रोजी पुन्हा वराडसीम येथील एकास जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याबाबत प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी आदेश काढल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सचिन संतोष सपकाळे (वराडसीम) असे हद्दपार करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.
दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणणारे, सार्वजनिक शांततेचा भंग करणारे आणि ज्यांच्यापासून समाजाला भीती असणाऱ्या १०० उपद्रवी व गुन्हेगारांना हद्दपार करण्यासाठी पोलीस प्रशासन कामाला लागले आहे. पहिल्या टप्प्यात ५५ जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडे पाठवण्यात आल्यानंतर त्यांच्या हद्दपारीचे आदेश लवकरच निघण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे आणखी ४५ जणांना हद्दपार करण्याबाबत प्रस्ताव पाठवले जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
जानेवारीत सादर झाला होता प्रस्ताव
सचिन संतोष सपकाळे यांच्या हद्दपारीबाबत ४ जानेवारी २०२१ या दिवशी प्रांताधिकारी कार्यालयात प्रस्ताव दाखल करण्यात आला. प्रांताधिकारी सुलाने यांनी पोलीस व संबंधिताचे म्हणणे ऐकून घेत दोन वर्षांसाठी सपकाळे यास हद्दपार करण्याचे आदेश काढले.
दरम्यान, मंगळवारीच शहरातील रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी याच्यासह आठ जणांना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच हद्दपारीचा आदेश निघाल्याने खळबळ उडाली आहे. शहरासह ग्रामीण भागातील उपद्रवींच्या हद्दपारीचे आदेशही लवकरच निघण्याची दाट शक्यता आहे.
भुसावळातील १०० उपद्रवींना हद्दपार करण्याचे नियोजन
कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणणारे, सार्वजनिक शांततेचा भंग करणारे आणि ज्यांच्यापासून समाजाला भीती आहे अशा १०० उपद्रवी व गुन्हेगारांना हद्दपार करण्यासाठी पोलीस प्रशासन कामाला लागले आहे. पैकी पहिल्या टप्प्यात ५५ जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडे पाठवण्यात आले आहेत. पुन्हा ४५ प्रस्ताव पाठवले जाणार आहेत.
शहरात गुन्हेगारी, वाढत्या गुंडगिरीमुळे सर्वत्र चिंता व्यक्त केली जाते. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी गेल्या आठवडाभरात उपद्रव माजवणाऱ्या दोन गुन्हेगारी टोळ्यांना जिल्ह्यातून हद्दपार केले. आता पुन्हा शहरातील १०० जणांच्या हद्दपारीची तयारी आहे. त्यापैकी ५५ जणांचे प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षकांकडे पाठवले आहेत. आगामी गणेशोत्सव, दुर्गोत्सव, दिवाळी आणि पालिका निवडणूक पाहता पोलीस प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. त्यात शहर, बाजारपेठ, तालुका पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेले, उपद्रवी रडारवर आहेत. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यात ४५ जणांच्या प्रस्ताव तयार करणे सुरू आहे.