जळगाव : जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाचे सुखद आगमन झाले. यामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. काही भागात दुबार पेरणीचे संकट टळले असले तरी अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. नगरदेवळा येथे रात्रभर भीजपाऊस झाला.
पाचोरा
पाचोरा तालुक्यात मध्यम पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे. तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले आही आणि तूर्त दुबार पेरणीचे संकट टळले आहे. काल तालुक्यातील मंडळनिहाय पडलेला पाऊस पाचोरा -८मि.मी. नांद्रा-२मि.मी. नगरदेवळा-१३मि.मी. गाळण - ३५मि.मी. कुऱ्हाड -५ मि.मी. पिंपळगाव- ८मि.मी. वरखेडी-८ मि.मी. आज सरासरी ११.२८ मि.मी. सरासरी-१५५.६६मि.मी. पाऊस झाला आहे.
भडगाव तालुक्यात पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी पिकांना रासायनिक खते देणे शेतकऱ्यांनी सुरू केले. कपाशी, ज्वारी, मका, बाजरी, सोयाबीन, मुग, उडीद, तूर आदी पिकांची बैलजोडी वा टिलरने कोळपणी करतांना शेतकरी दिसून आले.
चौकट
नगरदेवळा
नगरदेवळा परिसरात ८ रोजी रात्रभर भीज पाऊस झाल्याने, करपत चाललेल्या नवजात पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाला आहे. अग्नावती मध्यम प्रकल्पाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ८ रोजी रात्री १३ मि.मी. पावसाची नोंद झाली. एकूण १२२ मि.मी. पाऊस झाला. गतवर्षी याच तारखेपर्यंत २७७ मि.मी. पाऊस झालेला होता. परिणामी, तब्बल १५० मि.मी.च्या तुटीसह धरणातही शून्य टक्के साठा असल्याने परिसरावर संकटाचे सावट कायम आहे.
पाळधी
पाळधी, ता.जामनेर येथे पावसाने दमदार सुरुवात केल्याने पाळधीसह परिसरातील खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.तर शेती कामाला वेग आला आहे
पहूर, ता जामनेर येथे शुक्रवारी दुपारी झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे. पिकांना संजीवनी मिळाल्याने चैतन्य पूर्ण वातावरण निर्माण झाले.
वाघडू, ता. चाळीसगाव येथील परिसरात गुरुवार व शुक्रवार अशा दोन दिवसांपासून भीज पाऊस झाल्याने करपत चाललेल्या पिकांना संजीवनीच
मिळाली आहे.
आडगाव
आडगाव, ता. चाळीसगाव परिसरात फक्त आभाळामाया आडगाव आणि परिसरात सकाळपासून नुसती आभाळ माया सुरू आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार चार दिवस पावसाचे त्यातील दोन दिवस नेहमीप्रमाणे कोरडे गेले पुढील दोन दिवसात तरी जोरदार पाऊस येईल काय अशी आस बळीराजाला लागून आहे.
चौकट
पारोळा तालुक्यात दुबार पेरणीचे संकट कायम
पारोळा : पावसाने डोळे वटारल्याने दुबार पेरणीचे संकट कायम आहे. तालुक्यात जूनमध्ये दोन तीन वेळा मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यात बहुतांशी शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या होत्या. गेल्या ८ ते १० दिवसांपासून वरुण राजा रुसल्याने शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे. तालुक्यात १२२ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. मे महिन्यात लागवड झालेल्या कपाशी पिकाची ही बिकट अवस्था झाली आहे. विहिरीला पाणी असून विद्युत पुरवठा नसल्याने पिकांना पाणी ही देत येत नाही. कृषिपंपाना २४ तास विद्युत पुरवठा सुरू ठेवावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. अनेक ठिकाणी कोवळे पिके उन्हामुळे कोमजत आहे. तर त्यांना चुहा पाणी देऊन वाचविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.