मुक्ताईनगर : शहरातील पाणी पुरवठा गेल्या आठ दिवसांपासून खंडित झाला आहे. सर्वात आधी पूर्णा नदी पात्राला गाळयुक्त पूर स्थिती आल्याने जॅकवेलमधील पंप बंद पडले होते. यामुळे शहरातील पाणी पुरवठा बंद होता; परंतु गेल्या चार दिवसांपासून पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या प्रयत्नात बऱ्हाणपूर रोडवरील पुरुषोत्तम खेवलकर यांच्या शेताजवळ जलशुद्धीकरण केंद्रात पाणी वहन करणारी मुख्य पाइपलाइन फुटली होती. याच्या दुरुस्तीचे काम होताच पाणी सुरू करताच पुन्हा ती प्रेशरने फुटली. असे आजतागायत तिसऱ्यांदा झाले आहे. दरम्यान, या काळात शहरातील नागरिकांना पाण्याचा थेंब मिळेनासा झाला आहे.
घटनास्थळी आमदारांची भेट
दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाइपलाइन फुटलेल्या ठिकाणी भेट देत नगरपंचायतीचे पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता हर्षल सोनवणे यांना पाइप दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्याच्या सूचना केल्या व साहित्य चांगल्या दर्जाचे वापर करा, असेही सांगितले.
याप्रसंगी पाणी पुरवठा व स्वच्छता सभापती मुकेशचंद्र वानखेडे, गटनेते राजेंद्र हिवराळे, नगरसेवक पियुष महाजन, संतोष कोळी, आरिफ आझाद, नूर मोहम्मदखान, युनूसखान यांच्यासह नगरपंचायतीचे पाणी पुरवठा कर्मचारी सागर पुनासे, भगवान वंजारी, गोलू पाटील आदींची उपस्थिती होती.